नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये येत्या काही दिवसात पाण्यावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 59 वर्षांपूर्वी सिंधू जल करार झाला. या कराराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप दोन्ही देशांनी एकमेकांवर केला आहे. त्यामुळे लवकरच हा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न महत्त्वाचा आणि संवेदनशील ठरणार आहे. पाकिस्तानात सध्या पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. आर्थिक राजधानी असलेल्या कराचीजवळच्या भागातील महिलांना पाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागते. पाकिस्तानातल्या बऱ्याच भागांमध्ये हेच चित्र आहे. भारतातील परिस्थितीदेखील वेगळी नाही. भारतातील तीन-चतुर्थांश जनतेच्या घरांमध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. याशिवाय देशातील 70 टक्के पाणी प्रदूषित झालं आहे, अशी आकडेवारी सरकारच्या संशोधनातून समोर आली आहे. दुष्काळामुळे नद्या, धरणांमधील चित्र भयाण आहे. त्यामुळेच दोन्ही देशांमधील पाणी प्रश्न पेटू शकतो, असं वृत्त ब्ल्यूमबर्गनं दिलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू जल करार झाला. जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार झाला होता. याच कराराचं उल्लंघन होत असल्याचा भारत आणि पाकिस्ताननं एकमेकांवर केला आहे. सध्या भारताकडून चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पाचं काम सुरू आहे. यावर पाकिस्ताननं आक्षेप घेतला आहे. भारताकडून सिंधू जल कराराचा उल्लंघन सुरू असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे. यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी भीती पाकिस्तानला आहे.
या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्यांचं एक पथक चिनाब नदीजवळ पाठवणार आहेत. तर चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. यामुळे लवकरच हा प्रश्न चिघळू शकतो. याचा परिणाम केवळ दक्षिण आशियाच नव्हे, तर संपूर्ण जगावर होईल, अशी भीती आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.