हैदराबाद : लोकसभा निवडणुकांच्या निकालांत भाजपला सर्वाधिक जागा मिळणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा सत्तेवर येणार असा निष्कर्ष बहुतांश एक्झिट पोलमधून व्यक्त झाल्याने, तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) छावणीत निराशा पसरली आहे. निकालानंतर अधांतरी लोकसभा अस्तित्वात आल्यास सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी पूर्वतयारी करत असलेल्या या पक्षाच्या उत्साहावरच पाणी पडले आहे.
टीआरएसच्या ज्येष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, लोकसभा निवडणुकांत यूपीए किंवा एनडीए यापैकी कोणालाच बहुमत मिळणार नाही, असे आम्हाला वाटत होते. मात्र, एक्झिट पोलचे निष्कर्ष पाहाता, आमचा विचार चुकीचा ठरेल, असे दिसत आहे. भाजपप्रणित एनडीए पुन्हा केंद्रात सत्तेत आल्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे काँग्रेस व भाजपला वगळून प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्याचे स्वप्न विरून जाईल, असे दिसते.
तेलंगणामध्ये लोकसभेच्या१७ जागा आहेत. निवडणूक निकालानंतर टीआरएस राष्ट्रीय राजकारणात मोलाची भूमिका बजावणार, असे दावे केले जात होते. प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्याची कल्पना केसीआर यांनी गेल्या वर्षी मांडली होती. त्यासाठी त्यांनी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, एम. के. स्टॅलिन, नवीन पटनायक, एच. डी. देवेगौडा आदी नेत्यांची भेट घेतली होती, पण त्या प्रयत्नांनाअर्थच राहणार नाही, असे दिसतआहे. (वृत्तसंस्था)स्थिती पाहूनच निर्णयटीआरएसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत, तर तो पक्ष सरकार स्थापनेचा दावाही करू शकणार नाही. एनडीए व यूपीए यापैकी कोणीही सरकार स्थापनेसाठी टीआरएसशी संपर्क साधला, तर त्या वेळची स्थिती पाहूनच निर्णय घेण्यात येईल.