लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगारविरोधी, भांडवलदारधार्जिण्या धोरणाविरोधात गुरुवारी डाव्या संघटनांकडून देशभर पुकारलेल्या संपाला राज्यात सर्वत्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. शेतकरी व कामगारांनी काम बंद ठेवून थेट रस्त्यावर उतरले; तर कारवाईच्या भीतीने शिक्षक, बँकेसह सरकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारच्या धोरणाचा मूक निषेध नोंदवला.
केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात गुरुवारी ‘चलो दिल्ली’आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांना हरयाणाच्या सीमेवर अडवण्यात आले. त्यांना पाण्याच्या फवाऱ्यांना तोंड द्यावे लागले. नंतर शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभारलेले अडथळेही तोडले. केंद्र सरकारने व्यवसाय सुलभतेच्या नावाखाली २७ कायदे रद्द केले. यामुळे ७५ टक्के कामगारांना कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले. या कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपाला शहरी भागात चांगला तर ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीयकृत बॅंका, पोस्ट ऑफिस व केंद्रीय कार्यालयांत तुरळक उपस्थिती होती. मंत्रालयात मात्र संपाचा परिणाम जाणवला नाही.
मनसेचे आंदोलनवीजदरवाढीविरोधात मनसेने मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केले. आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही बंदी आदेश मोडून मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. -