निफाड : तालुक्यातील मानोरी खुर्द गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला असल्याची माहिती तालुक्याच्या गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनी दिली. टॅँकरसाठी रु ई येथील खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे तसेच गोरठान, भरवस येथे पाणीटंचाई असल्याने दोन्ही गावातील खासगी विहीर अधिग्रहित केल्या आहेत. तालुक्यातील लासलगाव, देवपूर, पाचोरे (बु.) गोळेगाव या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागल्याने येथील ग्रामपंचायतीचे विहीर अधिग्रहणासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव आले आहेत. पिंपळगावनजीक आणि विंचूर या गावांनी टँकरसाठी प्रस्ताव सादर केले आहेत.मागील वर्षी चितेगाव, महाजनपूर, पिंपळगावनजीक, टाकळी-विंचूर या चार गावात पाण्याचे टॅँकर सुरू करण्यात आले होते.निफाड तालुक्यात पाऊस कमी झाल्याने या तालुक्यात जमिनीतील पाण्याची पातळी सध्या खूपच खालावली आहे. त्यामुळे विहीर व विंधनविहिरीचे पाणी आटल्याने द्राक्षबागा जगवण्यासाठी द्राक्ष बागायतदारांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहे.
निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द येथे पाण्याच्या टॅँकर सुरू
By admin | Published: April 01, 2016 10:54 PM