चंडीगड - उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्यापासून अनेक भागांतून दुष्काळ आणि पाण्याच्या टंचाईच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी एका महानगरपालिकेने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पाण्याचा अपव्यय केल्यास दंडात्मक कारवाई करण्याची घोषणा चंडीगड महानगरपालिकेने केली आहे. या आदेशानुसार जर कुणी पाण्याचा अपव्यय करताना आढळले तर त्याच्यावर पाच हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. आजपासून या अभियानाची सुरुवात होणार आहे.
उन्हाळा वाढल्याने चंडीगडमध्येही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे चंडीगड महानगरपालिकेकडून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मोहीम सुरू केली जात आहे. या मोहिमेंतर्गत चंडीगडमध्ये आजपासून कुणी पाण्याचा आपव्यय केला तर अशा व्यक्तीवर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई होणार आहे.
चंडीगड महानगरपालिकेने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीच्या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी चंडीगड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली आहे. हे पथक पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. तसेच पाण्याच्या जोडणीला थेट बुस्टर पंप लावणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई होणार आहे. तसेच कुणाच्या छतावरील टाकीमधून पाणी ओतताना दिसले तर त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाईल.