भावेश ब्राह्मणकर नवी दिल्ली : पद्मविभूषण निर्मला देशपांडे यांनी दाखविलेल्या सर्वोदय परिवाराच्या मार्गावर चालले तर काय होऊ शकते हे उत्तर प्रदेशातील जखनी गावाने दाखवून दिले आहे. सरकारी निधीशिवाय गावाने लोकसहभागातून जलसमृद्धी मिळविली. बेरोजगारी, स्थलांतर, उपासमार यासह अनेक समस्यांवर गावाने मात केली असून, आता याच गावासारखे काम देशभरात साकारण्याचे काम सुरू आहे.बुंदेलखंड परिसरात २००१ ते २००३ या काळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे ज्येष्ठ गांधीवादी नेत्या निर्मला देशपांडे यांना समजले. जखनी गावचे सामाजिक कार्यकर्ते उमाशंकर पांडे २००५ मध्ये दीदींना भेटायला आले.
दीदींनी त्यांची भेट तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी करून दिली. ‘तुम्ही तुमचे गाव जलग्राम बनवा’, असे डॉ. कलाम यांनी सांगितले. वनराईचे संस्थापक मोहन धारिया व जलतज्ज्ञ अनुपम मिश्रा यांचीही भेट दीदींनी करून दिली. त्यानंतर पांडे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. प्रत्येकाने पाणी बचतीचे काम केल्यास आदर्शवत काम उभे राहील, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक शेतकºयाने शेतातच बांध घातले आणि बांधांवर झाडे लावली. तीन वर्षांनंतर त्या बांधांमुळे पावसाचे पाणी शेतातच जिरायला लागले. त्यातून भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली. चांगले उत्पन्न मिळू लागल्याने गावातून स्थलांतर थांबले.
अडीच हजार लोकसंख्येच्या गावाने जलसमृद्धी मिळवली. अडीच हजार क्विंटल बासमती तांदळाचे उत्पादन घेणे शक्य झाले आहे. रबीच्या हंगामात गहू, हरभरा, तीळ, मूग, उडीद ही पिके घेतली जात आहेत. गावातील भूजल पातळी दहा फुटांवर आली आहे. परिसरातील ग्रामस्थांनीही आता जखनीचा आदर्श घेत काम सुरू केले आहे. दीदींनी दाखविलेल्या मार्गामुळेच आज आम्ही हे करू शकलो. मात्र, आज समृद्धी पाहण्यासाठी त्या हयात नाहीत, असे पांडे सांगतात.निती आयोगाकडून दखलनीती आयोगाने ‘जल व्यवस्थापन २०१९’ या अहवालात गावाची दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ‘मन की बात’मध्ये गावाचे कार्य देशवासीयांना सांगितले. केंद्र सरकारने २०१६ मध्ये प्रत्येक जिल्ह्यात अशी दोन जलग्राम साकारण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासारखी अनेक गावे आता जलग्राम होत आहेत.