नवी दिल्ली : म्यानमारमध्ये दुय्यम आयुष्य जगावे लागणाऱ्या अनेक रोहिंग्या मुसलमानांचे हाल देश सोडल्यावरही सुरूच आहेत. आसपासच्या देशांमध्ये आसरा मिळविण्यासाठी बंगालच्या उपसागरामध्ये हाकारलेल्या त्यांच्या नावा अजूनही हेलकावे खात आहेत. म्यानमारमध्ये होणारा त्रास वाचविण्यासाठी हजारो रोहिंग्या मुसलमानांनी मिळेल त्या बोटींनी म्यानमारचा किनारा सोडला. थायलंड, इंडोनेशिया अशा कोणत्याही दिशांना त्यांच्या बोटी गेल्या. दोन-तीन महिन्यांहून अधिक काळ बोटींवर काढल्यानंतर काहींच्या बोटी थायलंडच्या किनाऱ्याला लागल्या. त्यांना निर्वासितांच्या छावण्यांमध्ये ठेवले आहे. मात्र, अजूनही शेकडो रोहिंग्या थायलंड, इंडोनेशिया आसरा देईल अशा अपेक्षेत फिरतच आहेत. अनेक बोटींवरील अन्न तसेच पाणीही संपत आले आहे. अशा स्थितीमध्ये रोहिंग्या किती काळ तग धरून राहणार ही काळजीचीच बाब आहे. या बोटी म्हणजे बंगालच्या उपसागरात तरंगणाऱ्या शवपेट्याच झाल्या आहेत.आशियाई स्थलांतरितांचे काय?उत्तर अफ्रिकेतील मोरोक्को, लिबियासारख्या देशांमधून इटली, ग्रीसमार्गे युरोपामध्ये नेहमीच बेकायदेशीर स्थलांतर होत असेत. त्यांच्याही बोटी भूमध्य सागरामध्ये संकटात सापडतात. यथाशक्ती युरोप त्यांना संकटातून बाहेरही काढतो. मात्र, रोहिंग्यांना कोणीच निवारा देत नाही, असे दिसून येत आहे. रोहिंग्यांचे मानवी हक्क तरी त्यांना मिळतील, अशी अपेक्षा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)४सुमारे १३ लाख लोकसंख्येचा असणारा रोहिंग्या हा एक मुस्लिम संप्रदाय आहे. म्यानमारमधील राखिने प्रांतात यांची सर्वांत जास्त वस्ती होती. मात्र, म्यानमारने या मुस्लिमांना नागरिकत्व देण्यास नकार दिला. म्यानमारमध्ये त्यांच्यावर शिक्षण, विवाह, जमीन अधिग्रहण अशा अनेक क्षेत्रांवर बंधने लादली. ४स्थानिक बौद्ध व रोहिंग्या यांचे संबंधही वांशिक आणि भाषिक कारणांमुळे नेहमीच तणावाचे राहिले आहेत. २०१२ साली दोन्ही वांशिक गटांत झालेल्या संघर्षामध्ये शेकडो नागरिकांना प्राण गमवावे लागले व एक लाख चाळीस हजार नागरिकांना घर सोडावे लागले. गेल्या तीन वर्षांमध्ये एक लाख वीस हजार रोहिंग्यांनी स्थलांतर केल्याचा संयुक्त राष्ट्रांचा (यूएन) अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरातील तरंगत्या शवपेट्या
By admin | Published: May 21, 2015 12:36 AM