Wayanad By Election Result 2024 latest News : वायनाड लोकसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळताना दिसत आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांनी वायनाड विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी घेतली असून, भाजप उमदेवार नव्या हरिदास तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे सत्ययन मोकरी हे आहेत.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने वायनाड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघातून काँग्रेसने प्रियांका गांधी यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली होती.
Maharashtra Election Results 2024
प्रियांका गांधी यांना मोठी आघाडी
मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सकाळी साडेदहा वाजेपर्यंत प्रियांका गांधी यांना मोठी आघाडी मिळाली. प्रियांका गांधी यांनी १ लाख ९० हजार १९२ मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मोकरी यांना ६५ हजार ३३६ मते मिळाली.
भाजपच्या नव्या हरिदास तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. त्यांना ३५ हजार ५०७ मते मिळाली. प्रियांका गांधी यांना साडेदहा वाजेपर्यंत १ लाख २४ हजार ८५६ इतके मताधिक्य मिळाले.
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही मतदारसंघातून ते विजयी झाले होते. त्यामुळे एका मतदारसंघाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला. रायबरेलीची खासदारकी ठेवत राहुल गांधींनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता.
पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रियांका गांधी यांना काँग्रेसने या मतदारसंघातून उमेदवारी दिली. तर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नव्या हरिदास यांना भाजपने प्रियांका गांधी यांच्याविरोधात मैदानात उतरवले होते.