भीषण! १५१ लोकांच्या मृत्यूनंतर वायनाडवर घोंघावतंय आणखी एक मोठं संकट, धबधब्याचा प्रवाह....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:19 AM2024-07-31T11:19:02+5:302024-07-31T11:27:55+5:30
केरळमधील धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. अथिरापल्ली धबधब्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धबधब्याचा प्रवाह पाहून थरकाप उडेल.
केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. लष्कर आणि एनडीआरएफचे पथक सातत्याने बचावकार्य करत आहेत. केरळमधील धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. अथिरापल्ली धबधब्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धबधब्याचा प्रवाह पाहून थरकाप उडेल.
राजा रामासामी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी आताचा व्हिडीओ आणि अथिरापल्ली धबधब्याचा तीन वर्षे जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या दोन्ही व्हिडिओंमध्ये धबधब्याचा प्रवाह खूप वेगळा आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिलं की, केरळमध्ये पावसामुळे, उत्तर केरळ, वायनाड भागात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन आणि पूर आला आहे, अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे, अनेक लोक अडकल्याची भीती आहे.
#Keralarains triggering huge landslides and flooding across North Kerala,Wayanad region. 20 people died, Many feared trapped.
— Chennai Weather-Raja Ramasamy (@chennaiweather) July 30, 2024
Athirapally falls today and 3 years back. pic.twitter.com/Vv8noAH1Df
उत्तर केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक बस ड्रायव्हर दोन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या एका पुलावर वाहन घेऊन जात असल्याचं दाखवलं आहे. वायनाड भूस्खलनात शेकडो लोकांच्या मृत्यूनंतर राज्यात दोन दिवसांचा दुखवटा आहे.
बचावकार्य सुरू
वायनाडमध्ये बचावकार्य सुरू झाले आहे. यापूर्वी एनडीआरएफ कमांडर अखिलेश कुमार यांनी म्हटलं होतं की, आता आम्ही बचाव कार्य सुरू करत आहोत. आमची टीम इथल्या अनेक गावात जाणार आहे. अनेक घरांमध्ये लोक अडकले असण्याची शक्यता आहे. काल रात्री आम्ही सुमारे ७० लोकांना वाचवलं. खराब हवामानामुळे रात्री बचावकार्य थांबवावं लागलं. येथे आणखी जोरदार पाऊस झाल्यास धोका वाढू शकतो.
"ही अत्यंत दुःखद घटना"
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "आम्ही सर्वांनी वायनाडमधील परिस्थिती गांभीर्याने घेतली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तिथे जाणार आहेत. आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. ही अत्यंत दुःखद घटना आहे. ही राष्ट्रीय आपत्ती असून यावर सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. काल राज्यसभेतही आम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता."