वायनाड/नवी दिल्ली :केरळमधीलवायनाड जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या दुर्घटनेआधी केरळला अनेक अलर्ट देण्यात आले होते असा दावा गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केला असून, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मात्र आम्हाला दुर्घटनेपूर्वी कोणतेही रेड अॅलर्ट मिळाले नव्हते, असे म्हटले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २००, तर जखमींचा आकडा २१९हून अधिक झाला आहे, तर अद्याप १९१जण बेपत्ता आहेत. दरडींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध अद्यापही सुरू असून दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरडींच्या ढिगाऱ्याखालून सुमारे १,५९२ लोकांची लष्करी जवानांनी मंगळवारी रात्रीपर्यंत सुटका केल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
मंगळवारी पहाटे घडलेल्या या दुर्घटनेत वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई आणि चुरलमाला येथे ३०० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. मृतांपैकी ७५ जणांची ओळख पटली असून १२३ जणांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. बचावकार्यात सापडलेले मृतदेह मेपाडी आरोग्य केंद्रात तसेच निलांबूर सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. दुर्घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्यात लष्कर, नौदल, ‘एनडीआरएफ’चे जवान सहभागी झाले आहेत. उद्ध्वस्त झालेली घरे, चिखल, राडारोडा यांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांची सुटका करताना खराब हवामानामुळे जवानांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. (वृत्तसंस्था)
उद्ध्वस्त घरांत करुण दृश्य
उद्ध्वस्त झालेल्या घरांमध्ये अनेकांचे मृतदेह जमिनीवर झोपलेल्या किंवा बसलेल्या अवस्थेत आढळून आले. दरड कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावल्याने अशी स्थिती निर्माण झाली. या दुर्घटनेत किती लोक बेपत्ता आहेत, याची माहिती वायनाड जिल्हा प्रशासन मिळवत आहे.
आव्हानांवर मात करून मदत
दरडी कोसळल्या तेव्हा त्या परिसरातील गावकरी साखरझोपेत होते. त्याच वेळी मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला. मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी देखील या भागात शिरल्याने वायनाडमधील काही गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे त्या ठिकाणी बचावकार्यासाठी जाणे हेदेखील एक आव्हान होते. मात्र, त्यावर मात करून बुधवारीदेखील दुर्घटनाग्रस्तांपर्यंत मदतीचे हात पोहोचले होते.