केरळमधील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत १५३ लोकांचा मृत्यू झाला असून १००० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. याच दरम्यान एक कुटुंब असंही आहे जे दुर्घटनेपूर्वीच घरातून बाहेर पडले होते, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. शकीरा नावाच्या महिलेला भीती वाटत होती त्यामुळे तिचं संपूर्ण कुटुंब वाचलं आहे. भूस्खलनामुळे वायनाडच्या चुरलमाला, मुंदक्कई, अट्टामाला आणि नूलपुझा भागात प्रचंड विध्वंस झाला आहे.
केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ मंगळवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं. याआधी सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत होता. मुसळधार पावसामुळे मुंदक्कई येथे राहणाऱ्या शकीरा नावाच्या महिलेच्या मनात भीती निर्माण झाली. यानंतर तिने पतीला आपली अस्वस्थता सांगितली आणि मुंदक्कई सोडून मेप्पडी येथील आपल्या घरी जाण्यास सांगितलं.
सुरुवातीला शकीराचा पती मोहम्मद अलीसने नकार दिला, पण नंतर होकार दिला. यानंतर शकीरा पती, मुलं आणि सासरच्या मंडळींसह मेप्पडी येथे गेली. शकीरा आणि तिच्या कुटुंबाने मुंडक्काई सोडल्यानंतर अवघ्या काही तासातच, परिसरात ही घटना घडली आणि केवळ तिचे शेजारीच नाही तर जवळचे नातेवाईकही वाहून गेले. भूस्खलनात तिचं घरही पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पण, शकीराच्या भीतीने तिचा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचा जीव वाचला.
शकीराच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून आमच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री पाऊस पडला तेव्हा माझी पत्नी घाबरली. काळजी करण्यासारखं काही नाही असं आम्ही तिला सांगितलं तरी तिने मेप्पडीला जाण्याचा आग्रह धरला. शेवटी आम्ही निघालो. काही तासांनंतर या भागात भूस्खलन झालं. आता फक्त माझं घर उरले आहे, पण ते चिखलाने भरलेलं आहे. जवळचे नातेवाईक आणि शेजारी अजूनही बेपत्ता आहेत.