महाठग सुकेश चंद्रशेखरने वायनाडमधील भूस्खलनासाठी १५ कोटी रुपये देण्याची मोठी घोषणा केली आहे. सुकेशने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना एक पत्र लिहून मुख्यमंत्री आपत्ती मदत निधीसाठी त्याच्या वतीने १५ कोटी रुपयांचं योगदान स्वीकारण्याची विनंती केली आहे. तो सध्या जेलमध्ये आहे.
केरळ सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे ते पाहून मला खूप दु:ख झालं आहे आणि या गरजेच्या वेळी मदत करण्याची इच्छा असल्याचं सुकेश चंद्रशेखरने म्हटलं आहे. त्याचे वकील अनंत मलिक यांनी हे पत्र त्याच्या वतीने लिहिण्यात आल्याची पुष्टी केली आहे.
सुकेशने पत्रात म्हटलं आहे की, "मी माझ्या फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री आपत्ती मदत निधीसाठी १५ कोटी रुपयांचं योगदान स्वीकारण्याची विनंती करतो. आज उल्लेख केलेल्या योगदानाव्यतिरिक्त, आणखी एक मी मदतीचा हात पुढे करू इच्छितो. बाधित लोकांसाठी मी ३०० घरांच्या तात्काळ बांधकामासाठी मदत करण्याचे आश्वासन देतो."
हे योगदान वैध व्यावसायिक खात्यांमधून दिलं जाईल, असा दावा सुकेश चंद्रशेखरने केला. हा प्रस्ताव मान्य करून वायनाड भूस्खलन दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या लोकांच्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठी त्याचा योग्य वापर करावा, अशी विनंती त्याने राज्य सरकारला केली आहे.
सुकेश चंद्रशेखर याच्या पत्राला केरळ सरकारने अद्याप उत्तर दिलेलं नाही. सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी मनी लाँड्रिंग आणि अनेकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सध्या जेलमध्ये आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी मुंडक्कई आणि चूरलमाला येथे झालेल्या विनाशकारी भूस्खलनात मृतांची संख्या २२६ वर पोहोचली आहे. बुधवारी स्थानिक प्रशासनाकडून एक रिपोर्ट जारी करण्यात आला, त्यानुसार १३८ लोक अद्याप बेपत्ता आहेत.