केरळमधील वायनाडमध्ये एकीकडे निसर्गाने कहर केला आहे, तर दुसरीकडे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर येत आहेत. भूस्खलनाचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबांना आपली घरं सोडावी लागली आहेत. मात्र आता जीव वाचवण्यासाठी त्यांनी सोडलेल्या घरांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.
चोरी होत असल्यामुळे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे. या दुर्घटनेचा फायदा घेऊन चोरटे लोकांच्या मौल्यवान वस्तू चोरत असल्याचं म्हटलं जात आहे. या परिसरात गस्त वाढवून चोरट्यांना पकडून शिक्षा करावी अशी विनंती लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
एका व्यक्तीने सांगितलं की, आम्ही असे लोक आहोत ज्यांनी या दुर्घटनेत सर्वस्व गमावलं आहे. आमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमचं घर सोडलं. मात्र त्यानंतर आम्ही आमच्या घराची स्थिती पाहण्यासाठी परत आलो तेव्हा दरवाजा तुटलेला दिसला. तसेच ते सध्या राहत असलेल्या रिसॉर्टमधील त्याच्या खोलीलाही चोरट्यांनी लक्ष्य करून त्यांचे कपडे चोरल्याची तक्रार त्यांनी केली.
चूरलमाला आणि मुंडक्काईसह आपत्तीग्रस्त भागात पोलीस गस्त घालत असल्याचं अधिकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी एका निवेदनात सांगितलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित भागात किंवा पीडितांच्या घरात रात्री विना परवानगी प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. बचावकार्याच्या नावाखाली रात्रीच्या वेळी पोलिसांच्या परवानगीशिवाय प्रभावित भागात किंवा घरांमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
वायनाडमध्ये झालेल्या भीषण भूस्खलनानंतर बाधित भागात बचावकार्य सुरू आहे. या अपघातातील मृतांची संख्या ३५० हून अधिक झाली आहे, तर २०६ लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, आयएमडीने वायनाडमध्ये सहा ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. अशा परिस्थितीत बचावकार्यावर परिणाम होऊ शकतो.