'आम्ही 23, 24, 25, 26 जुलै रोजी चार अलर्ट जारी केले', वायनाड भूस्खलनावर शाह स्पष्ट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 03:54 PM2024-07-31T15:54:30+5:302024-07-31T15:54:57+5:30
Wayanad Landslide : 'केंद्र सरकारने सात दिवस आधीच NDRF ची 9 पथके केरळला पाठवली होती. केरळ सरकारने वेळेवर काहीच उपाययोजना केल्या नाही.'
Amit Shah on Wayanad Landslide : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे आतापर्यंत सूमारे 158 लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक बेपत्ता आहेत. या घटनेचा मुद्दा बुधवारी(दि.31) राज्यसभेतही उपस्थित करण्यात आला. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. तसेच, केरळ सरकारला धारेवर धरले. शाह म्हणाले की, केंद्र सरकारने 23 जुलै रोजीच एनडीआरएफची 9 पथके केरळला पाठवली होती, पण केरळ सरकारने लोकांना स्थलांतरित करण्यासाठी काहीच केले नाही.
केरळ सरकारने वेळीच कारवाई केली नाही: अमित शाह
सभागृहात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी सुरुवातीला भूस्खलनामुळे प्राण गमावलेल्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. तसेच, या आपत्तीबाबत काही माहिती सभागृहात सांगितली. अमित शाह म्हणाले की, '23 तारखेलाच एनडीआरएफच्या 9 टीम केरळला पाठवल्या होत्या. केरळ सरकारला केंद्र सरकारने 23 जुलै रोजीच पूर्व इशारा दिला होता. केरळ सरकारला 23, 24 आणि 25 जुलै रोजीही पूर्वसूचना देण्यात आली होती. 26 जुलैला 20 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडेल, भूस्खलन होऊ शकते, चिखलही येऊ शकतो आणि काही लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे आम्ही आधीच सांगितले होते. केरळ सरकारने काय केले? लोकांचे स्थलांतर केले नाही. स्थलांतर केले असते, तर इतक्या लोकांचा जीव गेला नसता.'
#WATCH | Delhi: Union Home Minister Amit Shah says, "... Early warning was given, that is why on July 23, we sent 9 teams of NDRF and three more were sent yesterday. Had they become alert the day the NDRF teams landed, a lot could have been saved. But this is the time to stand… pic.twitter.com/Uj5TVM30F4
— ANI (@ANI) July 31, 2024
'कोणतेही राज्य एसडीआरएफमध्ये 10 टक्के रक्कम स्वतःच्या मर्जीनुसार खर्च करू शकते. आपत्तीच्या नावाखाली 10 टक्के खर्च केला तर कोणी विचारत नाही, पण 90 टक्के रक्कम मार्गदर्शक तत्त्वांनुसार खर्च करावी लागते. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील केरळ सरकारला 23 जुलै रोजीच संभाव्य भूस्खलनाबाबत इशारा देण्यात आला होता, पण सरकारने काहीच केले नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. केरळच्या जनतेच्या आणि तिथल्या सरकारच्या पाठीशी उभं राहण्याची ही वेळ आहे. नरेंद्र मोदी सरकार केरळच्या लोकांसोबत आणि तिथल्या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे', असेही त्यांनी यावेळी म्हटले.
#WATCH | On the Wayanad landslide, LoP in Lok Sabha Rahul Gandhi says "It is a huge tragedy in Wayanad and the military is doing a good job there. I think it is important that we support the people of Wayanad and I request the Govt to help the people of Wayanad. It is the second… pic.twitter.com/vT8mZ4Ic8K
— ANI (@ANI) July 31, 2024
वायनाड भूस्खलनावर राहुल गांधी काय म्हणाले?
'वायनाडमध्ये घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. सैन्य चांगले काम करत आहे. अशा कठीण प्रसंगी वायनाडच्या लोकांच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे. मी सरकारला तात्काळ मदतीची विनंती करतो. वायनाडमध्ये दुस-यांदा अशी दुर्घटना घडली आहे. 5 वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. या भागात पर्यावरणीय समस्या आहे, म्हणून याकडे लक्ष दिले पाहिजे आणि जे काही हाय-टेक उपाय केले जाऊ शकतात, ते करावे', अशी मागणी वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी यावेळी केली.