Wayanad Landslide : वायनाड भूस्खलनात कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू; 'तो' एकटाच वाचला, आठवणी केल्या 'डिलीट'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 09:09 AM2024-08-06T09:09:14+5:302024-08-06T09:17:20+5:30
Wayanad Landslide : वायनाडमध्ये भूस्खलनामुळे सर्व काही उद्ध्वस्त झालं. या विध्वंसात घर व कुटुंब सर्व वाहून गेलं. आई-वडिलांसह कुटुंबातील आठ सदस्य गमावले आहेत.
वायनाड भूस्खलनात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहीचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. याच दरम्यान एक काळजात चर्र करणारी घटना समोर आली आहे. १८ वर्षीय अभिजीत कलिंगन हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. अभिजीतला फोटो काढणं, सेल्फी घेणं आणि प्रत्येक आनंदाचे क्षण त्याच्या मोबाईलवर कॅप्चर करायला आवडतं. निसर्गसौंदर्य, हिरवळ, पर्वत, धबधबे, नद्या यांचे सुंदर फोटो त्याने मोबाईलमध्ये काढले आहेत. पण आता तो मोबाईलमधील सर्व फोटो एक एक करून डिलीट करत आहे.
वायनाडमध्ये भूस्खलनामुळे सर्व काही उद्ध्वस्त झालं. या विध्वंसात त्याचं घर व कुटुंब सर्व वाहून गेलं. त्याने आई-वडिलांसह कुटुंबातील आठ सदस्य गमावले आहेत. मेप्पाडी येथील सरकारी हायस्कूलमध्ये मदत शिबिरात बसलेल्या अभिजीतच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. या दुर्घटनेने त्याला खूप मोठा धक्का बसला आहे. त्याच्या हातात मोबाईल होता, ज्याच्या स्क्रीनवर तो आठवणींचे फोटो डिलीट करत होता.
अभिजीतने सांगितलं की, भूस्खलनाने त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा जीव घेतला. त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्य, आई-वडील, भावंडं, आजी, काका, मावशी, चुलत भाऊ असे सगळे वाहून गेले. त्यांच्या कुटुंबातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला. वायनाडमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्याच्या घरी जवळचे लोक आश्रय घेण्यासाठी आले होते.
कुटुंबात आता अभिजीत एकटाच जिवंत आहे. अभ्यासासाठी तिरुअनंतपुरमला असल्यामुळेच तो वाचला. त्याचं गाव सुरक्षित मानलं जात होतं कारण ते उंचावर होतं. तो त्याच्या सुंदर गावाचे भरपूर फोटो काढायचा. ते मित्रांसोबत शेअर करायचे, जे फोटो पाहून गावातील निसर्गसौंदर्याचं कौतुक करायचे. आपण या सुंदर गावात राहतो याचा त्याला अभिमान होता.
आज हे गावच एका भयंकर घटनेचं ठिकाण बनलं आहे. अभिजीतने सांगितलं की, त्याचे वडील, बहीण, काका आणि काकू यांचे मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडले, मात्र त्याची आई, भाऊ, आजी आणि चुलत भाऊ बेपत्ता आहेत. अभिजीतच्या मावशीचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेचा त्याच्या मानवर खोलवर आघात झाला असून त्या आठवणी त्याला त्रास देत आहेत.