काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी गुरुवारी वायनाड दुर्घटनेतील लोकांची भेट घेतली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल भावुक झाले. "मी माझे वडील गमावले तेव्हा ज्या दु:खात होतो तितकंच दु:ख आजही होत आहे. इथे लोकांनी फक्त वडील गमावले नाहीत तर काहींनी संपूर्ण कुटुंब गमावलं आहे. लोकांनी आई, वडील, बहीण, भाऊ गमावले आहेत."
"मला आता काय वाटतंय त्यापेक्षाही हे खूप जास्त गंभीर आहे. हे खूप वाईट झालं आहे. हजारो लोकं हे अनुभवत आहेत. या भयंकर आणि वाईट परिस्थितीत या लोकांसोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. मला अभिमान वाटत आहे की, संपूर्ण देशाचं वायनाडकडे लक्ष आहे आणि सर्वच जण, संपूर्ण देश वायनाडमधील लोकांना मदत करेल याची मला खात्री आहे" असं राहुल गांधी म्हटलं आहे.
"राजकीय मुद्द्यांवर बोलण्याची ही वेळ आहे असं मला वाटत नाही. येथील लोकांना मदतीची गरज आहे. सर्व मदत उपलब्ध आहे याची खात्री करण्याची हीच वेळ आहे. मला सध्या राजकारणात अजिबात रस नाही. मला वायनाडच्या लोकांमध्ये रस आहे" असंही राहुल यांनी म्हटलं आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली असून काही वायनाडमधील परिस्थितीचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.
"वायनाड दुर्घटनेची ही दृश्ये पाहून माझं मन खूप दुःखी झालं आहे. या कठीण काळात प्रियंका आणि मी वायनाडच्या लोकांसोबत उभे आहोत. आम्ही मदत, बचाव आणि पुनर्वसन याकडे बारकाईने लक्ष देत आहोत, सर्व आवश्यक मदत केली जाईल याची खात्री करून घेत आहोत. UDF सर्व शक्य मदत पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे."
"भूस्खलनाच्या आणि नैसर्गिक आपत्तींच्या वारंवार घडणाऱ्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत. सर्वसमावेशक कृती आराखड्याची नितांत गरज आहे" असंही राहुल गांधींनी म्हटलं. राहुल गांधी यांनी गुरुवारी केरळमधील वायनाड जिल्ह्यातील चुरलमाला येथील भूस्खलनग्रस्त भागाला भेट दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मेप्पाडी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात जाऊन जखमींची भेट घेतली.