काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नियमानुसार वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे वायनाडची लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. आता काँग्रेसने वायनाडमधून प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, प्रियंका गांधी यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची यावरून केरळमधील सत्ताधारी पक्ष असलेली डावी आघाडी संभ्रमात आहे. या जागेवर सीपीआयला उमेदवार उभा करायचा आहे. मात्र इथून कुणाला उमेदवारी द्यायची, याबाबतचा निर्णय घेणं पक्षासाठी संभ्रम वाढवणारं ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात डाव्या पक्षांनी एनी राजा यांचा दारुण पराभव झाला होता.
राष्ट्रीय पातळीवर सीपीआय इंडिया आघाडीचा पक्ष आहे. मात्र केरळमध्ये या डाव्या पक्षांचा काँग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत सीपीआयच्या नेत्या एनी राजा यांनी राहुल गांधींना आव्हान दिले होते. मात्र त्यांचा ३ लाख ६४ हजार मतांनी पराभव झाला होता. पण २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये राहुल गांधींचं मताधिक्य मात्र घटलं होतं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांची पत्नी एनी राजा यांनी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये सांगितले होते की, मी वायनाड येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. मात्र बिनॉय विस्वान यांच्या सांगण्यावरून मी निवडणूक लढले होते. दरम्यान, एनी राजा ह्या आता प्रियंका गांधी यांच्याविरोधात पोटनिवडणूक लढवण्यास इच्छुक नाही आहेत. त्यामुळे आता येथून निवडणूक लढवण्यासाठी नवा उमेदवार शोधण्याची जबाबदारी सीपीआयच्या केरळ कार्यकारिणीवर येऊन पडली आहे. दुसरीकडे वायनाडमधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला ही जागा आपल्याकडे राखण्याबाबत पूर्ण विश्वास आहे. वायनाडमध्ये केवळ प्रियंका गांधी यांच्या विजयाचं अंतर किती राहील याबाबतच उत्सुकता आहे, असा त्यांचा दावा आहे.