पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपा विरोधात कणखरपणे उभं राहण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. भाजपाकडून सर्व केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. केंद्र सरकार सूडाचं राजकारण करत असून यासाठी सीबीआय, ईडी, आयबी, आयकर विभागासह सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. लोकशाहीसाठी ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचं बॅनर्जी यांनी पत्रात नमूद केलं आहे.
भाजपा विरोधात लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीनं लढायला हवं, असं आवाहन करत बॅनर्जी यांनी विरोधकांच्या सर्वव्यापी बैठकीची मागणी केली आहे. भाजपा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन पुढील रणनिती आखायला हवी. त्यावर विचार करायला हवा, असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये बीरभूमी हिंसा प्रकरणावरुन राजकीय युद्ध सुरू आहे. यामुळे ममता सरकारला भाजपानं घेरलं आहे.
भाजपाविरोधात एकत्र येऊन लढण्याची वेळ आलीयभाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असून देशाच्या लोकशाहीवर हा हल्लाच असल्याचं बॅनर्जी यांनी पत्रात म्हटलं आहे. भाजपाच्या या सूडाच्या राजकारणाविरोधात एकजुटीनं लढण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्व भाजपा विरोधी पक्ष आणि नेत्यांना माझी विनंती आहे की एका बैठकीचं आयोजन केलं जावं. ज्यात आगामी काळातील रणनितीवर चर्चा केली जाऊ शकेल, असं ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटलं आहे.