नवी दिल्ली : ‘सर्व राज्यांमध्ये भाजपचीच लाट आहे. आम्ही सर्वत्र मोठा विजय मिळवू. पाच राज्यांतील जनता आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी नक्की देईल,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सबका साथ, सबका विकास हेच भाजपच्या कार्यशैलीचे सूत्र असल्याचेही ते म्हणाले.पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी सांगितले की, ‘देशाची प्रगती साधताना प्रादेशिक अस्मिताही जपणे आवश्यक असल्याची मला कल्पना आहे. मीही एका राज्याचा मुख्यमंत्री होतो, त्यामुळे राज्यांच्या भावना जाणून आहे. भाजपच्या बाजूने नेहमीच जनता उभी राहिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका होत असलेल्या पाचही राज्यांत भाजपचाच विजय होणार आहे.’मोदी यांनी सांगितले की, ‘एखादा पक्ष पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबाकडून चालविला जात असेल तर तिथे घराणेशाही निर्माण होते. जम्मू-काश्मीरमध्ये दोन पक्ष वर्षानुवर्षे असेच दोन कुटुंबांकडून चालविले जातात. हरयाणा, झारखंड, उत्तर प्रदेश, तामिळनाडू अशा राज्यांतही हेच चित्र दिसेल. घराणेशाही हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू आहे. संसदेत मी टीका करताना कोणाच्याही पिता किंवा आजोबांबद्दल बोललो नाही. आम्ही नेहरुंचा कधीही उल्लेख करत नाही, अशी काँग्रेस टीका करते आणि आम्ही नेहरुंचा उल्लेख केला की काँग्रेसला ते रुचत नाही.’कोणाचेही ऐकण्याची राहुल गांधींची तयारी नाहीकाँग्रेसचे नेते राहुल गांधी हे कोणतीही बाजू ऐकून घेण्यास तयार नसतात. अशा व्यक्तीला मी कसे उत्तर देऊ? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राहुल गांधी संसदेत कामकाजाप्रसंगी काही वेळा अनुपस्थित राहातात, अशी टीकाही त्यांनी केली. दोनजणांनी गुजरातमधील नेत्यांसंदर्भात वाईट दर्जाची टीका केली होती. त्यांना उत्तर प्रदेशने धडा शिकविला, असे मोदी म्हणाले. त्यांचा रोख समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर होता.शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते नवे कृषी कायदेमोदी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच नवे कृषी कायदे आणले होते. लोकहित लक्षात घेऊनच हे कायदे केंद्र सरकारने रद्द केले. शेतकऱ्यांचे भले व्हावे यासाठीच माझ्या सरकारने नेहमी काम केले आहे. त्यामुळेच आम्हाला नेहमीच शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आला, असा दावाही मोदी यांनी केला.
पंजाबमधील घटनेबद्दल बोलण्यास नकार- पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, पंजाबमध्ये माझ्या सुरक्षेबाबत जो प्रकार झाला, ते प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. - त्यामुळे या प्रकरणाविषयी मी काहीही बोलणार नाही. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाला होती, तशी समिती नेमण्याची तयारी सरकारने दाखविली. - उत्तर प्रदेश सरकार अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम करत आहे.