ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी याकूब मेमनला गुरुवारी सकाळी फाशी देण्यात आली असली तरी या फाशीवरुन अद्यापही राजकारण सुरुच आहे. माणसाला फाशी देणे ही दुर्दैवी घटना असून सरकार प्रायोजित हत्यांमुळे आपणही मारेकरीच ठरतो असे मत काँग्रेस नेते शशी थरुर यांनी मांडले आहे.
याकूब मेमनला फाशी दिल्यावर काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्विटरवरद्वारे फाशीच्या शिक्षेवर प्रतिक्रिया दिली. 'फाशीच्या शिक्षेमुळे प्रतिबंध येईल असे वाटते, पण प्रत्यक्षात स्थिती याऊलट आहे. जगभरात कोठेही फाशीच्या शिक्षेनंतर दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत' असे थरुर यांनी म्हटले आहे. सरकारने दहशतवादाविरोधात लढा दिला पाहिजेच पण फाशी हा पर्याय नाही असे त्यांनी नमूद केले . या ट्विटनंतर थरुर यांनी एका ठराविक प्रकरणाबद्दल मी हे बोलत नसून प्रश्न फाशीच्या शिक्षेसंदर्भात आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
शशी थरुर यांच्यापाठोपाठ दिग्विजय सिंह यांनीदेखील ट्विटरद्वारे सत्ताधा-यांना टोला लगावला. 'याकूब प्रकरणात सरकारने दाखवलेली कटीबद्धता स्वागतार्हच आहे, पण अशीच कटीबद्धता अन्य प्रकरणांमध्येही दाखवायला हवी. यात जात, धर्म याचा विचार करु नये' असा चिमटाही त्यांनी सरकारला काढला आहे.