ऑनलाइन लोकमत
मीरत, दि. १६ - भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद शामी याच्या कुटुंबियांची काऊ स्लॉटर किंवा गोभक्षक अशी मानहानी करत त्रास दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी तर शामीचा भाऊ हासीब याला अटक करण्यात आली, तो नंतर जामीनावर सुटला आहे.
मोहम्मद शामीचे वडील तौसीफ अहमद यांनी गौहत्येचा खोटा ठपका ठेवत माझ्या कुटुंबाला धोक्यात टाकण्यात आल्याचा आरोप केला आहे. ज्यावेळी गौहत्यासारखा प्रकार घडला त्यावेळी माझा मुलगा उपस्थितही नव्हता, इतर अनेकांप्रमाणेच तो नंतरच्या बघ्याच्या भूमिकेत होता, असा दावाही त्यांनी केला आहे. मोहम्मद शामीची भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यापासून काहीजण शत्रूत्वाने वागत असून जाणुनबुजून आम्हाला गोवण्यात येत असल्याचे तोसीफ यांनी सांगितले. सुमारे महिन्यापूर्वीच त्यांनी या प्रकारची तक्रार जिल्हा न्यायाधीशांकडे केली होती.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जिल्हा न्यायाधीश वेद प्रकाश यांनी तौसीफ यांनी तक्रार केली होती अशी पुष्टी दिली आहे. पोलीस अधिका-यांच्या सांगण्यानुसार ज्यावेळी गौहत्येचे प्रकरणआले, त्यावेळी पोलीस संबंधितांना अटक करण्यासाठी गेले होते. परंतु, शामीच्या भावाने तौसीफने पोलीसांना कारवाई करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी झटापटही केली, ज्यात एका पोलीस अधिका-याचा गणवेशही फाटला.