पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. तिथे ते अब्जाधीश एलन मस्कसह विविध क्षेत्रातील २४ लोकांची भेट घेणार आहेत. तसेच चीनला शह देण्यासाठी मोठी शस्त्रास्त्रांची डीलही करणार आहेत. अशातच मोदी यांनी अमेरिकेला निघण्यापूर्वी अमेरिकेच्या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी रशिया-युक्रेन युद्धावरील भारताच्या भूमिकेवर भाष्य केले आहे.
द वॉल स्ट्रीट जर्नलला मोदींनी मुलाखत दिली आहे. काही लोक आम्हाला रशिया-युक्रेन युद्धावर तटस्थ असल्याचे म्हत आहेत, मला वाटत नाहीय की ही भावना समस्त अमेरिकींच्या मनात आहे. भारताची भूमिका आता सर्व जगाला माहिती आहे. परंतू आम्ही तटस्थ नाही तर शांतीच्या बाजुने आहोत, असे मोदींनी म्हटले आहे. सर्वच देशांनी आंतरराष्ट्रीय कायदाचे आणि देशांच्या संप्रुभतेचा सन्मान करायला हवा. कोणत्याही प्रकारचे मतभेद युद्धातून नाही तर चर्चेतून सोडविता येतात. मी रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अनेकदा चर्चा केली आहे. शांती आणि स्थिरता आणण्यासाठी भारत नक्कीच प्रयत्न करेल असे मोदी म्हणाले.
अमेरिका आणि भारताचे संबंध आधीपेक्षा जास्त मजबूत बनले आहेत. कारण भू-राजकीय अशांततेच्या काळात भारत जागतिक स्तरावर आपले योग्य स्थान सुरक्षित करण्यासाठी पुढे जात आहे. ज्या देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अतिशय चांगले आहेत अशा देशांच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिका भेटीसाठी आमंत्रित करते, असे मोदी म्हणाले.
परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, नियम शिथिल करणे किंवा नोकरशाही संपवणे अशा आर्थिक आघाडीवर, मोदी सरकारचे अनेकदा कौतुक केले गेले आहे. शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सरकारने मोठी गुंतवणूक केली आहे. मोठमोठ्या कंपन्या भारतात पैसे गुंतवत आहेत. आता भारताची वेळ आली आहे. माझा देश जसा आहे तसा मी जगासमोर मांडतो आणि मी जसा आहे तसा मी स्वत:लाही मांडतो, असे मोदी म्हणाले.
भारतात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. तुम्हाला जगातील सर्व जाती-धर्माचे लोक भारतात सापडतील, असे उत्तर मोदींनी भाजप धार्मिक ध्रुविकरण करत असल्याचा प्रश्नावर दिले. चीनशी सामान्य द्विपक्षीय संबंधांसाठी सीमेवर शांतता आवश्यक आहे. भारत आपल्या सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी पूर्णपणे तयार आणि वचनबद्ध आहे, असा इशारा मोदी यांनी चीनला दिला आहे.