नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांच्यात अबकारी धोरणावरुन(एक्साइज पॉलिसी) मोठा वाद निर्माण झाला आहे. उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी केजरीवाल सरकारच्या उत्पादन शुल्क धोरण 2021-22मध्ये नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज याबाबत पत्रकार परिषद घेत, सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
'आम्ही तुरुंगाला घाबरत नाही'केजरीवाल म्हणाले, 'मोदी सरकार आम आदमी पक्षाच्या लोकप्रियतेला घाबरले आहे. त्यामुळेच ते आमच्या कामात जाणीवपूर्वक अडथळा आणत आहेत. आधी ईडीचा गैरवापर करून दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना तुरुंगात पाठवले आणि आता ते राज्याचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी सिसोदिया यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. ते अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहेत. तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकले तरी आम्ही घाबरत नाही. आम्ही भगतसिंगांची मुले आहोत.'
'आता देशभर ठिणगी पेटणार'केजरीवाल पुढे म्हणाले की, 'मी दिल्लीच्या जनतेला आश्वासन देतो की, यांनी कितीही कामात अडथळा आणला, आम्हाला तुरुंगात टाकले, तरीदेखील कामे थांबणार नाहीत. गेल्या 75 वर्षात या सर्व पक्षांनी मिळून देश उद्ध्वस्त केला. इतक्या वर्षात कितीतरी देश आपल्यापेक्षा खूप पुढे गेले. पण, आता दिल्लीतून एक ठिणगी पेटणार आणि ही ठिणगी देशभर पसरणार,' असेही ते म्हणाले.