ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 23 - गुजरात पाटीदार आंदोलन नेता हार्दिक पटेलने आपण भाजपाविरोधी नाही आहोत, पण आपला मोदीविरोध कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे. 'आपण भाजपा, समाजवादी पक्ष किंवा बहुजन समाज पक्षाचा विरोध करण्यासाठी आलेलो नाही. पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये पटेलांवर कारवाई करत घरात घुसून मारहाण केली होती. आंदोलनादरम्यान 13 तरुणांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे आपला मोदीविरोध कायम राहणार असल्याचं', हार्दिक पटेलने सांगितलं आहे.
हार्दिक पटेलने नोटाबंदीवरही भाष्य केलं आहे. 'नोटाबंदीमुळे काहीच होणार नाही आहे. प्रत्येक पक्षातील लोक आणि पक्ष भ्रष्टाचारात सामील आहे. नोटाबंदीमुळे शेतक-यांना त्रास होत आहे. मोदींचं गुजरात मॉडेल कर्जबाजारी झालं आहे. येणा-या दिवसांमध्ये देश कर्जबाजारी होणार आहे. गुजरातमध्ये 24 तास वीज असल्याचं प्रसारमाध्यमं दाखवतात, पण माझ्या काकांना वीज नसल्याने सकाळी तीन वाजता शेतात जावं लागतं', असं हार्दिक पटेलने सांगितलं आहे.