बेंगळुरू :महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, कर्नाटकातील एक इंचही जागा देणार नाही, असा पलटवार कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा निषेध केला आहे. हे दुर्दैवी आहे. मी त्या वक्तव्याचा निषेध करतो. या बाजूची एक इंचही जमीन कोणालाच दिली जाणार नाही, असे येडियुरप्पा यांनी ठणकावून सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत येडियुरप्पा यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन करत, कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत, असे म्हटले होते. यासंदर्भातील ट्विट्स मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आली होती.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू. सीमावासीयांच्या लढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता.