पाटणा - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने निवडणुकीनंतरची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांनी 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर पुढील सरकारचे नेतृत्व काँग्रेस करेल. मात्र युपीएच्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसच्या बाजूने सहमती नसेल तर दुसऱ्या कोणत्या पक्षाचा पंतप्रधान बनू देणार नाही अशी भूमिका काँग्रेस घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री यांनीही बुधवारी सांगितले की, आमचं लक्ष्य केंद्र सरकारमधून एनडीएला हटविणे आहे. सर्वसमंतीने जो निर्णय होईल काँग्रेस त्याच्यासोबत असेल. भाजपाला लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्या तर भाजपा व्यतिरिक्त अनेक राजकीय पक्ष एकत्र येऊन आघाडी स्थापन करतील. ज्यांची विचारधारा भाजपाशी जुळत नाही मात्र सत्तेसाठी सध्या ते भाजपासोबत आहेत. बहुदा तेदेखील निकालानंतर युपीएसोबत येतील असं सांगण्यात येत आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून भाजपाला 73 जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपाला 10 ते 15 जागा मिळू शकतात. त्यामुळे भाजपा खासदारांची संख्या कमी होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे एनडीएविरोधातील पक्ष एकत्र येऊन भाजपाविरोधात सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
मागील आठवड्यातही कपिल सिब्बल यांनीही काँग्रेसला 272 जागा जिंकता येणार नाहीत, हे आम्हाला माहित आहे. तसेच, भाजपालाही 160 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. पण, काँग्रेस प्रणित आघाडीचेच सरकार येईल असं विधान केलं होतं. त्यामुळे 23 मे रोजी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होईल, असेही सिब्बल यांनी म्हटलं होतं.
तर शरद पवार यांनीही मोदींचं सरकार फक्त 13 दिवस टिकेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी मोदींना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं तरी त्या सरकारची अवस्था 1996मधल्या वाजपेयी सरकारसारखीच होईल, असं सांगितलं आहे. भाजपाविरोधात सर्व पक्षांना एकत्र आणण्याचं काम सुरू आहे. 21 मे रोजी त्याला मूर्त स्वरूप येणार असल्याचंही पवार यांनी सांगितले आहे.