‘आम्ही केवळ गोव्याचे रहिवासी, मतदार नाही’; परप्रांतीयांना गोव्यातील मतदानात इंटरेस्ट नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 10:28 AM2022-02-10T10:28:10+5:302022-02-10T10:29:48+5:30

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, मणिपूर, उत्तरांचल, पश्चिम बंगाल, तसेच नेपाळमधून रोजगाराच्या निमित्ताने आलेले परप्रांतीय गोव्यात राहतात.

We are only resident of goa, not voters, People outside of goa have not interest in voting | ‘आम्ही केवळ गोव्याचे रहिवासी, मतदार नाही’; परप्रांतीयांना गोव्यातील मतदानात इंटरेस्ट नाही

‘आम्ही केवळ गोव्याचे रहिवासी, मतदार नाही’; परप्रांतीयांना गोव्यातील मतदानात इंटरेस्ट नाही

Next

राजेश निस्ताने -

पणजी : आधीच भौगोलिकदृष्ट्या लहान असलेल्या गोवा राज्यात स्थानिकांचा टक्का किती? असा सवाल नेहमीच उपस्थित केला जातो. त्यात तथ्यही आहे. कारण गोव्यात मूळ रहिवासी कमी आणि परप्रांतीयांचा भरणा अधिक, असा असमतोल निर्माण झाला आहे. त्यातही या परप्रांतीयांना गोव्यातील निवडणूक, मतदान आणि निकालात कोणताही इंटरेस्ट नसल्याचे त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून पुढे आले.

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, मणिपूर, उत्तरांचल, पश्चिम बंगाल, तसेच नेपाळमधून रोजगाराच्या निमित्ताने आलेले परप्रांतीय गोव्यात राहतात. नामांकित कंपन्यांपासून तर हॉटेल, पर्यटन, सुरक्षारक्षक, सफाई कामगार अशा सर्वच क्षेत्रांत परप्रांतीय नागरिक आहेत; परंतु, पैसा कमवा आणि कुटुंबाची उपजीविका चालवा, एवढाच त्यांचा दिनक्रम दिसतो.

गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाबाबत विविध घटकांत काम करणाऱ्या परप्रांतीयांना बोलते केले असता ‘आम्ही केवळ गोव्याचे रहिवासी आहे, मतदार नाहीत,’ असाच एकूण सूर त्यांच्या चर्चेतून पुढे आला. मतदानच करायचे नाही तर कोण कोणत्या पक्षाकडून उभा आहे याच्या खोलात जायचेच कशाला, असा उलट प्रश्न एकाने केला. 

२० ते २५ वर्षांपासून अनेक जण गोव्यात वास्तव्य करीत आहेत. त्यांची मुलेही येथेच लहानाची मोठी झाली; पण त्यांनी आपले नाव गोव्याच्या मतदार यादीत येणार नाही याची सातत्याने काळजी घेतली. शेवटी केव्हा तरी गावाकडेच (अपने देश) जायचे आहे असा विचार करून त्यांनी आपले नाव गावाकडील मतदार यादीतच कायम ठेवले. रेशनवरील धान्य व इतर शासकीय योजनांचा लाभ ते तिकडेच घेतात. आपल्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांवर मात्र परप्रांतीय नागरिक गोव्यातून वॉच ठेवतात.  उत्तर प्रदेशातील निवडणुकीत काय चित्र राहील ते विचारा; पण गोव्याचे काहीच विचारू नका, अशी भूमिकाच एका सलून व्यावसायिकाने मांडली.

महाराष्ट्रातील नेते ‘डोअर टू डोअर’ प्रचाराने त्रस्त
-    गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रातून काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख पक्षांचे अनेक नेते गोव्यात आले आहेत; परंतु येथे ‘डोअर टू डोअर’ प्रचाराच्या पद्धतीमुळे ही नेते मंडळी त्रस्त झाली आहेत.
-    सर्वच पक्षांकडून दोन डझनावर नेते-पदाधिकारी गाेव्यात आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला आले आहेत. 
-    गोव्यात जाहीर सभा, कॉर्नर सभांचे फॅड नाही. दिल्लीतून आलेल्या व्हीव्हीआयपींच्या सभेलाही दीड ते दोन हजारांची गर्दी खूप झाली. 
-    घरोघरी प्रचार हीच पद्धत येथे रूढ आहे. तेही मतदारांच्या सोयीने जावे लागते. मात्र, हे घरोघरी प्रचाराला जाणे नेत्यांच्या पचनी पडलेले दिसत नाही. 
-    आम्ही आमच्या विधानसभा मतदारसंघात कधी ‘डोअर टू डोअर’ गेलो नाही, गोव्यात कसे जावे, असा सवाल ही नेते मंडळी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारत आहेत.
 

Web Title: We are only resident of goa, not voters, People outside of goa have not interest in voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.