Supreme Curt ( Marathi News ) : बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. माफीनाम्याबाबत सुरू असलेल्या सुनावणीसाठी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण हे दोघेही कोर्टात हजर होते. या दोघांनीही सुप्रीम कोर्टाची माफी मागितली. मात्र पंतजली प्रकरणातील या माफीचा अद्याप स्वीकार केला नसल्याचं सुनावणीनंतर कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. तुम्ही आणखी काही बाबी दाखल करणार होतात, त्याचं काय झालं? असा प्रश्न बाबा रामदेव यांना कोर्टाने विचारला. त्यावर रामदेव यांच्यावतीने मुकुल रोहितगी यांनी उत्तर देत म्हटलं की, आम्ही अद्याप नवीन काही दाखल केलेलं नसून आम्ही सार्वजनिकरित्या माफी मागू इच्छितो. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सार्वजनिक माफी मागण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे.
सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना काही प्रश्न विचारले. "तुम्ही प्रसिद्ध आहात. योग क्षेत्रात तुमचं मोठं कामही आहे. नंतर तुम्ही व्यवसायही करू लागतात. तुम्हाला आम्ही माफी का द्यायला हवी?" असा प्रश्न न्यायाधीश कोहली यांनी बाबा रामदेव यांना विचारला.
कोर्टाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बाबा रामदेव यांनी म्हटलं की, "यापुढे आम्ही सतर्क राहू. कोट्यवधी लोग माझ्यासोबत जोडले गेले आहेत, याची मला जाणीव आहे." दरम्यान, नंतर कोर्टाने रामदेव यांच्यावर कठोर शब्दांत आसूड ओढत म्हटलं की, "तुम्ही आमच्या आदेशानंतरही हे सगळं केलं आहे. कायदा सगळ्यांसाठी समान आहे." दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार असून कोर्टाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण या दोघांनाही पुढील सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.