बुधवार आणि गुरुवारी मुंबईमध्ये होत असलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव हेसुद्धा मुंबईत पोहोचले आहेत. दरम्यान, मुंबईतील बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या खास शैलीमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला.
तेजस्वी यादव यांच्यासोबत मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी लालू प्रसाद यादव म्हणाले की, आम्ही मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांच्या मानगुटीवर बसण्यासाठी निघालो आहोत. आम्ही मोदींची मान पकडून ठेवली आहे. आता त्यांना केंद्रातील सत्तेतून हटवायचं आहे. लालू प्रसाद यादव यांचा आक्रमक अभिनिवेश पाहून त्यातून कार्यकर्त्यांना नवं बळ मिळेल, तसेच ऐक्याला बळ मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
तसेच लालू प्रसाद यादव यांचा आत्मविश्वास पाहता मुंबईत होणाऱ्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतात, असाही दावा केला जात आहे. तसेच या बैठकीमधून घेण्यात येणाऱ्या निर्णयांचा परिणाम देशाच्या राजकारणावर पडेल, असेही मानले जात आहे. सध्यातरी मुंबईत होणाऱ्या बैठकीमधून जागावाटप आणि निवडणूक लढवण्याबाबतच्या फॉर्म्युल्यावर एकमत करण्याचे प्रयत्न होतील, अशी शक्यता आहे.