शांतीनिकेतन- भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांच्या सुवर्ण अध्यायाची निर्मिती आपण करत आहोत अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांच्या सुधारलेल्या नात्याबद्दल मत व्यक्त केले. दोन्ही देशांना त्रासदायक वाटणारे अनेक प्रश्न सुटले आहेत आणि काही प्रश्न लवकरच सुटण्याच्या मागार्वर आहेत असेही पंतप्रधानांनी यावेळेस सांगितले.अनेक समस्या इतक्या वर्षांमध्ये प्रलंबित होत्या. त्या सुटणे असंभव मानले जात होते. मात्र आम्ही दोन्ही देशांनी सहमतीने त्यावर उत्तरे शोधली आहेत. 1965 (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) पासूनच दोन्ही देशांना जोडणाऱ्या मार्गांचा प्रश्न होता. मात्र आता आम्ही सर्व शक्य त्या मार्गांनी दोन्ही देशांना जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही कोलकाता ते खुलना अशी एसी बससेवा सुरु केलेली आहे. विश्व भारती विद्यापिठामध्ये बांगलादेश भवनाच्या उद्घाटनाच्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळेस बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेदही उपस्थित होत्या.शेख हसिना वाजेद यावेळेस बोलताना म्हणाल्या, रोहिंग्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून बांगलादेश सरकारने आश्रय दिला आहे. त्या लोकांना म्यानमारने परत बोलवावे यासाठी भारताने म्यानमारवर दडपण आणले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. "जवळपास 11 लाख रोहिंग्या बांगलादेशात राहात आहेत. आम्ही त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून आसरा दिला आहे. आपल्या देशातल्या 16 कोटी लोकांबरोबर आणखी सात ते आठ लाख लोकांचे पालन तू करु शकतेस का असं माझी बहिण रेहानाने विचारलं होतं. तरिही मी रोहिंग्यांना म्यानमारने परत घ्यावे यासाठी म्यानमारवर दडपण आणण्यास मी तुमची मदत मागते." असे त्या म्हणाल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन भारत आणि बांगलादेश यांच्यामधील भूसीमेचा करार पूर्णत्त्वास नेला तेव्हा माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू होते अशा शब्दांमध्ये त्यांनी भारत आणि बांगलादेश यांच्यामधील कराराबद्दल भावना मांडल्या. जगभरामध्ये एनक्लेव्हजची देवाणघेवाण करण्यासाठी युद्धं झालेली आपण पाहिली आहेत मात्र भारत आणि बांगलादेशाने मात्र शांततामय मार्गाने एन्क्लेव्हजची देवाणघेवाण केली असे त्या म्हणाल्या.
...हा तर भारत- बांगलादेश यांच्या संबंधातील सुवर्ण अध्याय- पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 3:19 PM