बिहारमध्ये नितीशकुमार आज आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राजद, काँग्रेस आणि मांझी यांच्यासोबत आघाडी करून नितीशकुमार यांनी भाजपाला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. भाजपाने जदयू फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. यातून सावध होत त्यांनी पक्ष वाचविला, असा दावा केला आहे.
असे असताना भाजपाने आपण महाराष्ट्रात शिवसेना का फो़डली हे सांगत नितीश कुमार यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी NDA आघाडी अंतर्गत निवडणूक लढवली होती आणि जनतेने JDU आणि BJP ला पाठिंबा दिला होता. जेडीयूने बिहारचा विश्वासघात केला आहे. मतदारांनी दिलेल्या मतांशी खेळले आहेत, असा आरोप बिहारचे भाजपा नेता आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.
आम्ही 74 जागा जिंकण्यात यशस्वी झालो, पण पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले आणि एनडीए आघाडीत नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. पण आज जे काही घडले तो बिहारच्या जनतेशी आणि भाजपसोबतचा विश्वासघात आहे. शिवसेनेने देखील महाराष्ट्रात असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही शिवसेना फोडली. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले, असा इशारा मोदी यांनी दिला.
नितीश कुमार यांना राजदमध्ये तो आदर मिळणार नाही जो त्यांनी भाजपसोबत असताना मिळवला. आम्ही त्यांना अतिरिक्त जागा न घेता मुख्यमंत्री बनवले. अडथळा आणण्याचा प्रयत्न केला नाही, असेही सुशीलकुमार मोदी म्हणाले.