ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - आम्ही सत्तेत असताना ११४ कोटी रुपयांमध्ये ४२ हजार आसनक्षमतेचे स्टेडियम उभारले, तर काँग्रेसच्या काळात स्टेडियमच्या नूतनीकरणावर ९०० कोटी रुपये खर्च झाले असे सुनावत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रतुत्यर दिले आहे. दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनमध्ये (DDCA) जेटलींच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हिवाळी अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्यात आले. यावेळी विरोधकांचा समाचार जेटलींनी घेतला. प्रचंड गदारोळादरम्यान, विरोधकांना उत्तर देताना जेटलींनी खाली बसा, जी तथ्य मी मांडणार आहे ती तुम्हाला अस्वस्थ करणारी असतिल असे सांगितले. यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला. जेटली दिल्ली क्रिकेट बोर्डाचे २०१३ पर्यंत सलग १३ वर्ष प्रमुख होते. भाजपाचे खासदार किर्ती आझाद यांनी विशेष तपास पथकाच्या माध्यमातून या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. आझाद यांनी जेटलींचे नाव न घेता दिल्ली क्रिकेट बोर्डात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या बेछुट आरोपांना जेटलींनी केजरीवाल यांच्यासह अन्य आपच्या नेत्यांवर१० कोटी रुपयांचा बदनामी खटला दाखल करून उत्तर दिले आहे. आम आदमी पार्टीने केवळ DDCA वर भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत, तर माजी सॉलीसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली क्रिकेट बोर्डाच्या अनियमततेची चौकशी करण्यासाठी आयोग नेमला आहे.