अयोध्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करून अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्याचा मानस आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना याठिकाणी राहता यावं यासाठी सोयीची जागा मिळावी. त्यासाठी १०० खोल्यांचे महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: प्रयत्नशील आहेत. याबाबत यूपीच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून आणि पत्राद्वारे संवाद साधणार आहेत अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली.
युवासेना प्रमुख आणि शिवसेना मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) हे अयोध्या येथे प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहचले आहेत. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी अयोध्येत गर्दी केली होती. आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर पदाधिकारी हजर होते. राज्यभरातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी अयोध्येत पोहचले आहेत.
यावेळी आदित्य ठाकरे पत्रकार परिषेदत म्हणाले की, या ३-४ वर्षात शिवसेना कुटुंबासोबत चौथ्यांदा येतोय, उत्साह आणि जल्लोष तसाच आहे. राज्य तसेच परराज्यातील शिवसैनिक रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत आलेत. आमच्यासोबत जो उत्साह आणि जल्लोष आहे त्याचे चित्रिकरण देशाला माध्यमांनी दाखवावं. पहले मंदिर फिर सरकार हा नारा आपण दिल्यानंतर वर्षभरात कोर्टाचा निकाल आला. कोर्टाच्या निकालामुळे अयोध्येत मंदिर निर्माण होत आहे. ही आमची तीर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नाही. राजकारण करायला आलो नाही तर दर्शनासाठी आलोय असं त्यांनी सांगितले.
तसेच शिवसेनेचे हिंदुत्व सगळ्यांना माहिती आहे. प्राण जाए पर वचन ना जाए. राजकारणासाठी नव्हे दर्शनासाठी आम्ही येतो. कोविड काळामुळे मधल्या काळात जमलं नाही. परंतु मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे याठिकाणी आले होते. आम्ही प्रभू रामाचं आणि हनुमानाचं दर्शन घेणार आहोत. कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिर उभे राहतेय हे सत्य आहे. संसदेत विशेष कायदा करून मंदिर उभारावं अशी मागणी शिवसेनेने केली होती. परंतु ते झालं नाही असं आदित्य ठाकरेंना सांगितले.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर बोलणं टाळलंमी दुसऱ्याच्या भूमिकेवर बोलणार नाही. माझं बृजभूषण सिंह यांच्याशी फोनवरून बोलणं झालं. कोविड काळात महाराष्ट्रात परराज्यातील लोकांना प्राधान्य दिले. कोण कोणाचं स्वागत करतंय त्यापेक्षा मंदिर निर्माण व्हावं यासाठी पुढाकार घ्यावा. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडू शकतो दुसऱ्या पक्षाशी नाही असं सांगत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधावर बोलणं टाळलं.