शाळांमध्ये, मोबाइल सिम कार्डसाठी, बँकेत खातं उघडताना किंवा खासगी सेवापुरवठादार कंपन्यांच्या सेवांसाठी आधार कार्ड बंधनकारक नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या, बँका, म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स पॉलिसींशी जोडलेलं आधार कार्ड आता आपण 'डिलिंक' करू शकतो.
आधार घटनात्मकदृष्ट्या वैध आहे आणि त्याने नागरिकांच्या 'प्रायव्हसी'च्या हक्काचा भंग होत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. मात्र त्याचवेळी, आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून करता येणार नाही आणि या कारणासाठी कोणीही आधार कार्ड मागू शकणार नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलंय. त्यामुळे आता आपण पॅन कार्ड, इन्कम टॅक्स रिटर्न आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीच आधार कार्ड बंधनकारक असेल. इतर ठिकाणी दिलेले आधार डिटेल्स हटवण्याबाबत आपण अर्ज करू शकतो.
व्होडाफोन, एअरटेल, रिलायन्स जिओ यासारख्या टेलिकॉम कंपन्यांनी आधार कार्डवरून घेतलेला ग्राहकांचा डेटा डिलीट करण्याबाबतचे निर्देश दूरसंचार मंत्रालयाकडून जायला हवेत. तसंच, बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये खातेदारांनी आधार लिंक केलं होतं. तिथल्या आधार डिटेल्सबाबत रिझर्व्ह बँक किंवा अर्थ खात्याकडून निर्देश दिले जातील, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिली.
कसं कराल आधार डिलिंक?
बँक खात्याशी जोडलेलं आधार डिलिंक करायचं असेल तर बँकेत जाऊनच ते करावं लागणार आहे. त्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाही. बँकेत जाऊन आपल्याला फक्त 'अनलिंक आधार' फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यानंतर ४८ तासात आपल्या खात्याशी जोडलेलं आधार डिलिंक होईल. याची खातरजमा तुम्ही फोन बँकिंगवरून करू शकता.
Paytm शी जोडलेल्या आधारचं काय?
पेटीएमशी आधार लिंक केलं असेल, तर 01204456456 या कस्टमर केअर क्रमांकावर फोन करा. आधार अनलिंक करण्यासाठीचा ई-मेल आपल्याला पाठवायला सांगा. पेटीएमकडून आलेल्या मेलला तुम्हाला तुमच्या आधार कार्डची सॉफ्ट कॉपी अटॅच करून रिप्लाय करायचा आहे. त्यानंतर पुढच्या ७२ तासांत पेटीएम वॉलेटवरून आपलं आधार कार्ड डिलिंक होईल.