नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख अर्थात सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. भागवत म्हणाले की, संघाच्या दृष्टीकोनातून देशातील 130 कोटी जनता हिंदूच आहे. बुधवारी एका कार्यक्रमात भागवत म्हणाले की, देशातील लोकांची धर्म आणि संस्कृती काहीही असो ते हिंदूच आहेत.
जे लोक राष्ट्रवादी आहेत. भारतीय संस्कृतीचा सन्मान करतात ते सर्व हिंदू आहेत. संपूर्ण समाज आपलाच असून सर्वांना एकत्र करण्याची संघाची इच्छा आहे. ते हैदराबाद येथील विजय संकल्प कार्यक्रमात बोलत होते. भारत देश परंपरेने हिंदुत्ववादी असल्याचे यावेळी भागवत यांनी नमूद केले.
भागवत यांनी इंग्रजांच्या काळातील फोडा आणि राज्य करा या राजकीय धोरणाची आठवण उपस्थितांना करून दिली. तसेच रविंद्रनाथ टागोर यांचा उल्लेख करत त्यांनी हिंदू आणि मुस्लिम ऐक्यावर जोर दिल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. स्वदेशी सभेचा उल्लेख करत भारतीय समाजाने एकतेच्या दिशेने वाटचाल करायला हवी. भारतात जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. ते केवळ वेगवेगळ्या धर्माचे पालन करत आहेत. त्यामुळे सर्वजन भारतीय असून भारतमातेचे पुत्र असल्याचे भागवत यांनी म्हटले.