चंदीगड : पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्ही जाणूनबुजून टिप्पणी केली नव्हती. प्रसारमाध्यमांनी आमचे मत चुकीच्या पद्धतीने मांडले, असे हरियाणा व पंजाब उच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वागावे, असेही हायकोर्टाने नमूद केले आहे.राम-रहीमला गेल्या आठवड्यात दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसाचारावरून पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला फटकारले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे नव्हे, तर देशाचे पंतप्रधान आहेत. मुख्यमंत्री हे राज्याचे आहेत, भाजपचे नव्हेत, अशा शब्दांत सरकारला सुनावले होते. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी पुन्हा झाली. त्यावेळी मुख्य न्यायाधीश एस.एस. सरोन यांनी सरकारच्या वकिलांना सांगितले की, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याविरोधात न्यायालयाने जाणूनबुजून टिप्पणी केली नव्हती. न्यायालयाला राजकारणापासून लांब राहायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायाधीशांनी प्रसारमाध्यमांनाही सुनावले. ‘आम्ही व्यक्त केलेले मत चुकीच्या पद्धतीने बातमीत मांडू नका. आम्ही निकालपत्रात जो निकाल देतो, त्याचा उल्लेख बातमीत करा. आम्ही सुनावणीच्या वेळी मांडलेले मत हा चर्चेचा भाग असतो. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वागावे,’ असे न्यायालयाने सांगितले. ‘या प्रकरणात माध्यमांनी जबाबदारीने काम केलेले नाही. आमचे मत चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले’ असेही मुख्य न्यायाधीशांनी सांगितले. (वृत्तसंस्था)देश कोणाही पक्षाचा नाहीडेरा सच्चा सौदाच्या समर्थकांनी हरियाणामध्ये हैदोस घातला होता, यावरून न्यायालयाने गेल्या आठवड्यात सरकारी वकिलांना धारेवर धरले होते. राष्ट्रीय एकात्मता आणि कायदा व सुव्यवस्था यांचे पालन महत्त्वाचे आहे. देश कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. पंजाब व हरियाणा ही वसाहत असल्यासारखे वागू शकत नाही, असेही न्यायालयाने त्यावेळी म्हटले होते.
पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही मुद्दाम टिप्पणी केली नाही, राम-रहीमप्रकरणी माध्यमांना सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 2:33 AM