नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात भाजपाचा पराभव करण्यासाठी २८ पक्षांची इंडिया आघाडीही रणनीती आखत आहे. परंतु इंडिया आघाडीता जागावाटपावरून समन्वयापूर्वीच वादाच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी थेट टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जींना युती नको आहे, त्या मोदींची सेवा करण्यात मग्न आहेत अशी टीका त्यांनी केली.
तृणमूल काँग्रेसने (TMC) पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला केवळ दोन लोकसभेच्या जागा लढवण्यासाठी देण्याचा प्रयत्न केला आहे. सूत्रांनुसार, २०१९ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसीला राज्यात ४३ टक्के मते मिळाली होती आणि २२ जागा जिंकल्या होत्या. अशा परिस्थितीत तृणमूल बंगालमध्ये प्रबळ पक्ष असून जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना मिळावा अशी पक्षाची इच्छा आहे. एका इंग्रजी चॅनेलनं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे.
गुरुवारी काँग्रेसने टीएमसीच्या या फॉर्म्युल्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले, ममता यांच्याकडे कोणी भीक मागितली हे मला माहीत नाही. आम्ही कशाची भीक मागत नाही. युती हवी असं ममता स्वत: सांगतायेत. पण आम्हाला ममतांच्या आधाराची गरज नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो असं त्यांनी स्पष्ट सुनावले. त्याचसोबत ममता बॅनर्जी यांना आघाडी नको. त्या तर मोदींची सेवा करण्यात मग्न आहेत असंही चौधरींनी म्हटलं.
दरम्यान, जागावाटपाचा एक स्पष्ट फॉर्म्युला निश्चित आहे. ज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाईल. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं सर्व ४२ जागांवर उमेदवार उभे केले होते. परंतु त्यातील केवळ २ जागाच काँग्रेसला जिंकता आल्या. देशातील सर्वात जुन्या पक्षाला पश्चिम बंगालमध्ये केवळ ५.६७ टक्के मते मिळाली. जी सीपीआयपेक्षाही कमी आहेत. सीपीआय(M) ला राज्यात ६.३३ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे इंडिया आघाडीत जागावाटपावरून येत्या काळात रस्सीखेच लागल्याचे दिसून येईल.