लखनऊ: उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर या दोन लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बुधवारी भाजपाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे निराश झालेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी, आम्हाला समाजवादी पक्षाला (सपा) एवढे यश मिळेल, असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या निवडणुकीत एकमेकांचे हाडवैरी असलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने (बसपा) युती केली होती. मात्र, इतक्या मोठ्याप्रमाणावर बसपाची मते थेट सपाला मिळतील, याची कल्पना आम्हाला नव्हती. आम्ही संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर या सगळ्याचे व्यवस्थित विश्लेषण करू. जेणेकरून भविष्यात बसपा, सपा आणि काँग्रेस एकत्र आल्यास आम्हाला तयार राहता येईल. तसेच आम्ही 2019मधील विजयाच्यादृष्टीने रणनीती आखू, असे केशवप्रसाद मौर्य यांनी सांगितले. पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल येणे बाकी असला तरी आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये 'सपा'ने दोन्ही ठिकाणी मोठी आघाडी घेतली आहे. 24 व्या फेरीनंतर फुलपूर येथे सपाच्या उमेदवाराकडे 36 हजार 559 मतांची आघाडी घेतली आहे. तर गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाकडे 20 व्या फेरीनंतर 28 हजार 358 मतांची आघाडी आहे.
'सपा'ला एवढे यश मिळेल अशी कल्पना केली नव्हती; भविष्यात सावध राहू- भाजपा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 4:04 PM