ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २९ - 'कोणी गळ्यावर चाकू ठेवला तरीही भारत माता की जय म्हणणार नाही' या वक्तव्यामुळे वादाच्या भोव-यात सापडलेले एमआयएम पक्षाचे नेते व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ' आम्हाला कोणाकडूनही देशभक्तीचे प्रमाणापत्र मिळवण्याची गरज नाही' असे म्हटले आहे. सोमवारी लखनऊमधील एका सभेदरम्यान ते बोलत होते. विशेष म्हणजे या सभेपूर्वी झालेल्या पक्षबैठकीत त्यांनी 'हिंदुस्थान जिंदाबादा ' आणि 'जय हिंद' अशा घोषणा दिल्या.
मुस्लिमांनी या देशासाठी खूप काही केले आहे, मोठे बलिदान दिले आहे असे सांगत फक्त ' भारतमाता की जय ' ही घोषणा न दिल्याने कोणी आमच्या देशभक्तीबाबत शंका घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ' आम्हाला कोणाकडूनही देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही' असेही सांगत आमच्या देशभक्तीवर शंका घेणारेच देशद्रोही असल्याचे ते म्हणाले. ' जे आमच्यावर शंका घेत आहेत त्यांचा १८५७ पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत कुठेच पत्ता नव्हता. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आम्ही ( मुस्लिम) जीवाचे बलिदान दिले, आम्ही ब्रिटीशांकडे कधीच दयेची भीक मागितली नाही' असेही ओवेसींनी नमूद केले.