एस. पी. सिन्हादरभंगा : केंद्रातील सत्ताधारी रालेआचे नेते राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा निवडणुकांत मते मिळविण्यासाठी वापर करत असल्याचा विरोधकांच्या आरोपांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ते म्हणाले की, दहशतवाद निपटून काढणे आवश्यक असून, त्यामुळे सरकारी तिजोरीतील पैसा गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी अधिक प्रमाणात वापरणे शक्य होईल.बिहारमधील दरभंगामधील प्रचारसभेत पंतप्रधान म्हणाले की, लोकसभा निवडणुकांमध्ये पहिल्या तीन टप्प्यांत भाजप व रालोआ उमेदवारांच्या बाजूने मतदान झाल्याने काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष अस्वस्थ झाले आहेत. बालाकोटवर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेल्या हल्ल्याचे पुरावे मागणे महाभेसळ आघाडीने सोडून दिले असून, ते आता ईव्हीएममधील त्रुटी शोधत आहेत.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे कंदील हे निवडणूक चिन्ह असल्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी या राज्यातल्या दुर्गमातील दुर्गम गावामध्ये वीज पोहोचवली आहे. त्यामुळे राजदचा कंदील मंदावला आहे. या सभेला नितीशकुमार व सुशीलकुमार मोदी हेही उपस्थित होते. इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक यासिन भटकळ याने दहशतवादी कारवायांसाठी दरभंगामध्ये विणलेले जाळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने काही वर्षांपूर्वी उद्ध्वस्त केले होते. त्याचा संदर्भ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, असे प्रकार यापुढे घडणार नाहीत. हा चौकीदार अत्यंत सतर्क आहे याची खात्री बाळगा. त्यांचा पराभव करा वंदेमातरम म्हणणे माझ्या धर्मश्रद्धांच्या विरोधात असल्यामुळे त्याचा मी कधीही उच्चार करणार नाही, असे वादग्रस्त विधान दरभंगातील राजदचे उमेदवार अब्दुल बारी सिद्दिकी यांनी नुकतेच केले होते. त्याचा संदर्भ देत, पण बारी यांचे नाव न घेता मोदी म्हणाले की, अनामत रक्कम जप्त होईल अशा पद्धतीने या उमेदवाराचा सणसणीत पराभव करायला हवा.