कोगनोळी : राष्ट्रवादी पक्ष गमावलेला राष्ट्रीय दर्जा मतांची टक्केवारी वाढवून परत मिळवण्यासाठीच मैदानात उतरलेला आहे. त्यांची सध्या भाजपसोबत बोलणी सुरू आहेत. त्याबद्दलच्या घडामोडी पाहयला मिळत आहेत. त्यामुळे भविष्यात हा पक्ष आमच्या सोबत किती काळ असेल हे सांगू शकत नाही असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निपाणी मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काका पाटील यांच्या कोगनोळी येथील प्रचार सभेमध्ये केला.तर, कर्नाटकातील विद्यमान मंत्री चाळीस टक्के कमिशन घेतल्याशिवाय कामे करत नाहीत. लहान मुलांना देण्यात येणाऱ्या खाऊमध्येही घोटाळा केला जातो आहे. अशाप्रकारे हे डबल इंजिन सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारी आहे. त्यामुळे काका पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीला निवडून देऊन परिवर्तन घडवूया. हेच कर्नाटकातील परिवर्तन देशात बदल घडवून आणेल, असेही चव्हाण म्हणाले. काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ कोगनोळी येथे आयोजित प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते. स्वागत व प्रास्ताविक माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी केले.ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती चव्हाण पुढे म्हणाले, या कमिशनखोर लोकांना कंटाळून एका अभियंत्याने आत्महत्या केली. आता जनतेनेच काँग्रेस सरकार आणण्याचे ठरवले आहे. त्यामुळे इतर पक्षातील दिग्गज नेते काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. त्यामुळे निपाणी मतदारसंघातून काका पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची बनली आहे. पण काकांच्या मागे ही सर्व सामान्य जनता खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे पुढील नऊ दिवस कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे गुलाल आपलाच आहे, असे आवाहन वीरकुमार पाटील यांनी अध्यक्षपदावरून बोलताना केले.यावेळी आप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांकडून 51 हजार तर कोगनोळी ग्रामपंचायत सदस्यांकडून एक लाख रुपयांची देणगी उमेदवार काका पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी काँग्रेस निरीक्षक मोहन जोशी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, सुमित्रा उगळे, पंकज खोत, सतीश पाटील, प्रकाश कदम, अनिल कुरणे, कुमार माळी, संजय कोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते रोहन साळवे, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या अमृता पाटील यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.फक्त टक्केवारीसाठीच मैदानातचाळीस टक्के कमिशन घेऊन काम करणारे विरोधक पैशाच्या टक्केवारीसाठीच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर आपल्या पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढवून गमावलेला राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्यासाठीच राष्ट्रवादी पक्ष मैदानात उतरला असल्याचे चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.
'राष्ट्रवादी' किती काळ आमच्या सोबत माहिती नाही, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 1:23 PM