नवी दिल्ली: सुंजवां येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या धर्माचा उल्लेख करून राजकारण करणारे एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना भारतीय लष्कराने खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. सैन्याच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अनबू यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी म्हटले की, शहिदांचा कोणताही धर्म नसतो. जे लोक सैनिकांच्या धर्माचा उल्लेख करून राजकारण करू पाहतात, त्यांना अजूनपर्यंत भारतीय सैन्य म्हणजे काय ते कळालेलेच नाही, असे देवराज अनबू यांनी म्हटले. एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सुंजवां येथील दहशतवादी हल्ल्यात 5 काश्मीरी मुसलमानांचा मृत्यू झाल्याचे सांगत मुस्लिमांच्या देशप्रेमावर शंका घेणाऱ्यांना फटकारले होते. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या ७ पैकी ५ जवान हे काश्मिरी मुसलमान होते. आता यावर कोणी काहीच बोलताना दिसत नाही. मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणाऱ्यांनी यावरून धडा घेतला पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.
शहिदांचा कोणताही धर्म नसतो; ओवेसींना भारतीय लष्कराचे खणखणीत प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 2:52 PM