ट्रेन तिकीट खरेदीसाठीही आमच्याकडे पैसे नाहीत; गोठवलेली खाती पूर्ववत करा: काँग्रेस नेते खरगे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 07:02 AM2024-03-22T07:02:56+5:302024-03-22T07:03:18+5:30
निवडणुकीत सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी पक्षाची खाती पूर्ववत करा, अशी मागणी खरगे यांनी केली.
नवी दिल्ली : आमची सर्व बँक खाती आयकर विभागाने भाजपच्या इशाऱ्यावर गोठवली असून आता आमच्याकडे रेल्वेचे तिकीट खरेदी करण्याइतपतही पैसे नाहीत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. गोठवलेली बँक खाती पूर्ववत करा, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. या निर्णयाचा केवळ काँग्रेसलाच नाही तर भारतातील लोकशाहीलाही फटका बसत आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्ही कोणताही प्रचार करू शकत नाही. आमच्या निवडणूक लढवण्याची क्षमतेला धक्का बसला आहे, असे सांगत राहुल यांनी पक्षाची खाती गोठवण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “निवडणुकीत सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी पक्षाची खाती पूर्ववत करा,” अशी मागणी खरगे यांनी केली.
काँग्रेस सोयीस्करपणे दोष देत आहे : नड्डा
काँग्रेसची खाती गोठवण्यात आल्याचा आरोप भाजप पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी फेटाळून लावला.