"ईव्हीएम नको, बॅलेट पेपर पाहिजे" : महाराष्ट्रातल्या पराभवानंतर मल्लिकार्जुन खरगेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 06:55 PM2024-11-26T18:55:24+5:302024-11-26T18:56:35+5:30
आम्हाला ईव्हीएम नको तर बॅलेट पेपर पाहिजे अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.
Mallikarjun Kharge: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केव्हाही कोसळू शकतं असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीच्या जनगणनेला घाबरतात कारण त्यांना भीती आहे की मग प्रत्येकजण आपला वाटा मागू लागेल, असं खरगे यांनी म्हटलं. आम्हाला ईव्हीएम नको तर बॅलेट पेपरवर मतदान हवं असल्याची मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये संविधान रक्षक अभियान कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बोलत होते. महाराष्ट्रातल्या निकालानंतर मतदान बॅलेट पेपरद्वारे व्हायला असं खरगे यांनी म्हटलं आहे. या मागणीसाठी ‘भारत जोडो यात्रे’सारखी मोहीम सुरू करावी लागेल, असेही खरगेंनी म्हटलं. मला ईव्हीएम नको आहेत. बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची आमची मागणी असल्याचे मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितले.
"एससी, एसटी, ओबीसी, गरीब वर्गातील लोक पूर्ण ताकदीनिशी मतदान करत आहेत. पण त्यांची मते वाया जात आहेत. आम्हाला बॅलेट पेपरच्या माध्यमातून मते हवी आहेत. ईव्हीएम मशीन पंतप्रधान मोदीजींच्या घरात किंवा अमित शहांच्या घरात नाहीतर अहमदाबादच्या गोदामात ठेवून द्या. पण आमची बॅलेट पेपरची गरज आहे,” असाही टोला मल्लिकार्जुन खरगेंनी लगावला.
"काही लोक राज्यघटनेचे वरवरचं गुणगान गाता. आतून ते त्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाच्या रक्षणासाठी राहुल गांधीनी भारत जोडो यात्रा सुरू केली आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व अल्पसंख्याक पुढे आले. त्यामुळेच आम्ही पंतप्रधान मोदींना रोखू शकलो. आज त्यांचे सरकार बहुमताचे नसून अल्पमतातील सरकार आहे. पंतप्रधान मोदींचे सरकार टीडीपीचे चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पाठींब्याने उभे आहे. जर कोणी पाठिंबा काढला तर हे सरकार पडेल," असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
"तुम्ही सत्तेत आलात आणि लूट करून अदानी, अंबानी आणि त्यांच्यासारख्यांना देत आहात. या लोकांनी कधीही देशाचा विचार केला नाही. मोदी आणि ते एकमेकांबद्दल विचार करतात. महाराष्ट्राच्या निवडणुकीत अदानींनी महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून मी हे म्हणत आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना खूप संपत्ती दिली आणि ते थांबवू शकले नाहीत. निवडणुकीत ते भाजपच्या वतीने वाटप करत आहेत. त्यांच्यात संस्थात्मक एकात्मतेचा अभाव आहे," अशी टीका मल्लिकार्जुन खरगेंनी केली.