नवी दिल्ली – देशात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे सीमेवरही तणाव सुरु असल्याचं चित्र आहे. लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये अनेकदा खटके उडत असतात, चीनने याठिकाणी युद्ध सराव करत भारताविरोधात आक्रमक रणनीती वापरली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या सीमेवरही दररोज गोळीबार, चकमकी सुरु असतात. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे.
गुजरात जनसंवाद संमेलनात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, पाकिस्तान आपल्या देशाच्या एका बाजूला आहे, तर चीन दुसऱ्या बाजूला आहे. आम्हाला शांतता आणि अहिंसा हवी आहे. आम्ही कधीही भूतान किंवा बांगलादेशाची जमीन हिसकावण्याचा प्रयत्न केला नाही. आम्हाला पाकिस्तान किंवा चीनची जमीन नको, आम्हाला फक्त शांतता हवी असं त्यांनी सांगितले.
कोरोनावर लवकरच लस मिळेल
याच कार्यक्रमात गडकरींना कोरोना संकटावरही भाष्य केले. देशात कोरोना संकट आणखी जास्त काळ टिकणार नाही. आपले वैज्ञानिक आणि इतर शास्त्रज्ञ दिवसरात्र कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच कोरोनावर लस शोधली जाईल असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला.
भारतात मागील २४ तासांत कोरोनाचे ११ हजार ९२९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा आकडा ३ लाख २० हजारांवर पोहचला आहे. संक्रमणामुळे एका दिवसात ३११ लोकांचा मृत्यू होऊन आतापर्यंत मृतांचा आकडा ९ हजारांवर गेला आहे. देशात १ लाख ४९ हजार ३४८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत तर १ लाख ६२ हजार ३७८ रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.
देशात एकीकडे कोरोना संकट असताना दुसरीकडे सीमेपलीकडूनही भारताविरोधात षडयंत्र सुरुच आहेत. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तानने कुरापती सुरुच ठेवल्या आहेत तर कोरोनासाठी जबाबदार धरण्यात येत असलेल्या चीनने लडाख सीमेवरुन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर नेपाळसारख्या देशानेही भारताचे तीन भूभाग त्यांच्या नकाशात दाखवून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. नेपाळच्या नवीन नकाशाला नेपाळच्या संसदेत मंजूरीही देण्यात आली आहे. चीनसोबत तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशातील सैन्य स्तरावर अनेक बैठका सुरु आहेत तरीही चीन-भारत सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यात अपयश आलं आहे.