नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भाजपत सर्व काही ‘आॅलवेल’ नाही हे पक्षाचे ज्येष्ठ नेते शांता कुमार यांच्या पवित्र्याने उघड झाले आहे. विविध राज्यांतील भाजप नेत्यांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपांनी आमची मान शरमेने खाली गेली आहे, असे सांगत भ्रष्टाचाराच्या मुकाबल्यासाठी ‘लोकपाल’ची मागणी करणारा ‘लेटरबॉम्ब’ शांता कुमार यांनी टाकला आहे.हिमाचल प्रदेशचे भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार शांता कुमार यांनी या संदर्भात पक्षाध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. मंगळवारी खुद्द शांता कुमार यांनीच ही माहिती दिली. मी भाजप अध्यक्षांना पत्र लिहिले आहे भाजपने ऐतिहासिक विजय मिळवून सरकार स्थापन केले, शिवाय एक वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण करून अनेक चांगली कामे केली. मात्र यानंतर अनेक ठिकाणी पक्षाच्या कामगिरीला काळिमा फासणारे प्रकार उघड होऊ लागले. राजस्थानपासून महाराष्ट्रापर्यंत भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येऊ लागली. भाजप सरकारच्या कामगिरीने आमची मान उंचावली होती; पण या प्रकरणांमुळे आमची मान शरमेने खाली झुकली, असे शांता कुमार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. भ्रष्टाचार रोखायचा असल्यास भाजपने लोकपालच्या धर्तीवर समिती नेमावी आणि नेत्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
व्यापमंमुळे आमची मान शरमेने झुकली
By admin | Published: July 21, 2015 10:43 PM