काँग्रेस पक्षाचे ८४ वे अधिवेशन गुजरातमध्ये होत आहे. यावेळी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. आम्ही दलित, मुस्लिम आणि ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसी आम्हाला सोडून गेल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे.
भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गड असलेल्या गुजरातमध्येकाँग्रेसने राष्ट्रीय अधिवेशन भरविले आहे. जवळपास ६४ वर्षांनी काँग्रेसचे गुजरातमध्ये अधिवेशन होत आहे. काँग्रेसच्या या खेळीकडे एक मास्टरस्ट्रोक म्हणून देखील पाहिले जात आहे. यापूर्वी १९६१ मध्ये भावनगरला अधिवेशन झाले होते.
यावेळी मीडिया रिपोर्टनुसार कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल यांनी आम्ही मुस्लिमांबद्दल बोलतो, म्हणूनच आम्हाला मुस्लिम समर्थक म्हटले जाते. आपल्याला अशा गोष्टींची भीती बाळगण्याची गरज नाही. आपल्याला मुद्दे उपस्थित करत राहावे लागतील, असे सांगितले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपावर टीका केली. सरदार वल्लभभाई पटेल यांची विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या विरुद्ध आहे. तरीही स्वातंत्र्यलढ्यात कोणतेही योगदान नसलेली संघटना आज त्यांचा वारसा हक्क सांगत आहे. अशी विचारसरणी असलेले लोक गांधीजींचा चष्मा चोरू शकतात आणि काठीने मारू शकतात. पण ते कधीही त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करू शकत नाहीत, असे खर्गे म्हणाले.
अधिवेशनात काय काय ठरणार...गुजरातमधील साबरमती नदीच्या किनारी आजपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होईल. पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात देशातील काही राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी अहमदाबाद येथे आलेले पक्षाचे नेते शशी थरूर यांनी सांगितले की, आम्ही देशाच्या वर्तमान परिस्थितीचा सामना करण्यासाठी रणनीतीवर चर्चा करू.