नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांना मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत मोदींनी त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या दिवसांवर भाष्य केले आहे. माझं जीवन अत्यंत गरिबीत गेले, परंतु आम्ही कधीही त्याचे ओझं घेतले नाही असं सांगत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आयुष्यातील हलाखीच्या परिस्थितीची आठवण काढली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जो माणूस चांगले बूट घालतो, त्याच्याकडे बूट नसतील तर काहीतरी कमी आहे असं वाटत राहते. परंतु आम्ही आमच्या आयुष्यात कधी बूट घातलाच नव्हता त्यामुळे बूट घालणे एक खूप मोठी गोष्ट असते हे आम्हाला माहिती नव्हते. आम्ही तुलना करण्याच्या स्थितीत नव्हतो. माझी आई खूप मेहनत करायची, वडीलही खूप परिश्रम घ्यायचे. वडील शिस्त पाळायचे. ते दररोज सकाळी ४ किंवा ४.३० वाजता घरातून निघायचे. लांबचा प्रवास करून मंदिरात जात होते, त्यानंतर तिथून दुकानात जात होते असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय माझे वडील पारंपारिक चामड्याची बूट घालायचे जे गावात हातानेच बनवलेले होते. ते खूप कडक असायचे, चालताना त्या बूटामधून टक टक आवाजही यायचा. जेव्हा माझे वडील दुकानावर जायचे तेव्हा गावातील लोक सांगायचे, त्यांच्या पाऊलांच्या आवाजावरूनच दामोदर भाई जातायेत याचा अंदाज लावायचे. ते रात्री उशिरापर्यंत न थकता काम करायचे. माझी आईही घरची परिस्थितीशी जाणीव ठेवून काम करत होती परंतु यातही त्यांनी कधीही आमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ दिला नाही असं मोदींनी म्हटलं.
दरम्यान, जेव्हा मी माझ्या कुटुंबाचं बोलतो, त्यात माझे वडील, आई, आम्ही भाऊ बहीण, माझे काका-काकी, आजी आजोबा सगळे एकत्र राहायचो. आम्ही खूप छोट्या घरी राहत होतो. कदाचित ही जागा खूप मोठी असेल जिथे आपण हा पॉडकास्ट करतोय. माझ्या घराला खिडकीही नव्हती. शाळेत जाताना बूट घालण्याचा प्रश्नच नव्हता. एक दिवशी मी शाळेत जाताना वाटेत मामा भेटला, त्यांनी अरे, तू असा का शाळेत जातोय, बूट नाहीत का असं विचारत त्यांनीच मला बूट खरेदी करून दिले. त्यावेळी कॅनवास बूटाची किंमत १०-१२ रूपये असेल अशीही आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढली.