नवी दिल्ली : देशातील नामांकित पैलवान आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. सिंह यांनी महिला पैलवानांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करावी या मागणीसाठी पैलवान मागील एक महिन्यापासून आंदोलन करत आहेत. आज २३ मे रोजी या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला. ब्रीजभूषण यांनी महिला पैलवानांसह, महिला प्रशिक्षकांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करेपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका पैलवानांची आहे. मंगळवारी पैलवानांनी इंडिया गेटवर कॅंडल मार्च काढून शांततेत निदर्शने केली. विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
कॅंडल मार्चदरम्यान माध्यमांशी बोलताना विनेश फोगाटने आगामी काळातील रणनितीबाबत भाष्य केले. येत्या २८ मे रोजी नव्या संसद भवनासमोर महिला पंचायत होणार असून याचे नेतृत्व महिलाच करतील असे विनेशने सांगितले. "सर्वांनी निर्णय घेतला आहे की, २८ तारखेला नव्या संसद भवनासमोर महिला महापंचायत होणार आहे. आम्ही उठवलेला आवाज दूरपर्यंत जाणं गरजेचं आहे. आज आम्हाला न्याय मिळाला तर देशातील अन्य महिलांना आम्ही हिम्मत द्यायचा प्रयत्न करू", असंही फोगाटनं सांगितलं.
मंगळवारी काढण्यात आलेल्या कॅंडल मार्चमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील हजेरी लावली. यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनियाने आक्रमक पवित्रा घेत आमच्या बहिणींचा आदर आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त असल्याचे म्हटले. याशिवाय जोपर्यंत देशातील मुलींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.
आंदोलनाला एक महिना पूर्ण ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) माजी अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.