अयोध्या: मोदी सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर पुढील 200 वर्षे खड्डे पडणार नाही, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केला आहे. रस्ते तयार करताना आम्ही गुणवत्तेसोबत, कंत्राटदारांसोबत कोणतीही तडजोड करणार नाही. त्यामुळे मोदींच्या सत्ताकाळात तयार झालेले रस्ते दीर्घकाळ टिकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जे काम गेल्या 70 वर्षांमध्ये झालं नाही, ते आम्ही 5 वर्षांमध्ये केलं, असं म्हणत त्यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला लगावला. अयोध्येत पाच प्रकल्पांच्या भूमीपूजनानंतर ते बोलत होते. नितीन गडकरींनी काल 7195 कोटी रुपयांच्या पाच प्रकल्पांचं भूमीपूजन केलं. हा कार्यक्रम जीआयसी मैदानावर आयोजित करण्यात आला होता. 'उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलत आहे. रस्ते सिमेंट आणि काँक्रिटचे रस्ते तयार होत आहेत. या रस्त्यांवर 200 वर्षे खड्डे पडणार नाहीत. कारण आम्ही दर्जाशी कोणतीही तडजोड करणार नाही,' असं गडकरी म्हणाले. 'अयोध्या प्रभू रामाची नगरी आहे. गेल्या दौऱ्यात ज्या प्रकल्पांची मी घोषणा केली, त्यांचं काम सुरू करण्यासाठी मी आलो आहे. आता ज्या प्रकल्पांचं भूमीपूजन झालं आहे, त्यावर पुढील दोन महिन्यात वेगानं काम सुरू होईल,' असंदेखील त्यांनी सांगितलं. अयोध्येत विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणाऱ्या नितीन गडकरींनी राम मंदिरावर बोलणं टाळलं. त्यांनी फक्त विकासकामांवर भाष्य केलं. 'अयोध्या छावणी ते मनकापूर गोंडापर्यंत 70 किलोमीटरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येईल. याचा आराखडा तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय अयोध्येतील पाच नाल्यांची एसटीपीच्या मदतीनं सफाई करण्यात येईल,' असं गडकरी म्हणाले.
आम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर 200 वर्षे खड्डे पडणार नाहीत- गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 11:22 AM